गुवाहाटी विद्यापीठातील एका २२ वर्षीय विद्यार्थिनीचा शहरातील एका होमस्टेमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या २६ वर्षीय प्रियकराला ताब्यात घेण्यात आलं आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या केली असं त्याने सांगितलं आहे. मात्र या प्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या मुलीच्या वडिलांनी माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असा आरोप केला आहे.
नेमकी घटना घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारापूर येथील रहिवासी आणि गुवाहाटी विद्यापीठात समाजशास्त्राची विद्यार्थिनी असलेली निमिषा ठाकूरिया ही आसिफ अली नावाच्या तरुणासह गराल भागातील एका होमस्टेमध्ये मुक्कामाला होती. शनिवारी पहाटे ती बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर तिला तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून तिला गुवाहाटी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. आता या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे.
निमिषाच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?
माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. तिची हत्या करण्यात येण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार करण्यात आले. आमच्या मुलीने संध्याकाळी ५ वाजता घर सोडलं होतं. मी माझ्या मित्रांसह जेवायला जात आहे असं तिने सांगितलं होतं. साधारण रात्री १० वाजता तिने आईला फोन केला होता आणि सांगितलं होतं की तिने हे सांगितलं होतं की युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये ती राहणार आहे. त्यानंतर पहाटे २ वाजता तिने आईला फोन केला आणि सांगितलं माझा श्वास कोंडतो आहे. मला हे लोक मारहाण करत आहेत, मला वाचव. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली, त्याआधी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर दोरीने तिचा गळा आवळण्यात आला असंही तिच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
माझ्या मुलीचा शारीरीक छळ करण्यात आला. कारण तिच्या शरीरावर त्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. शनिवारी पहाटे दोन वाजता या मुलीने माझ्या पत्नीला कॉल करून हे सांगितलं होतं की आई मला हे लोक मारून टाकतील. तिच्या फोनच्या आधीच तिचा शारीरीक छळ करण्यात आला आहे असं वाटतं आहे, असंही मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान आसिफ अली या निमिषाच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने पोलिसांना हे सांगितलं आहे की निमिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान आम्ही त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवलेला नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची तपासणी प्राथमिक स्तरावर आहे. आमचा प्राथमिक अंदाज हाच आहे की ही हत्या आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
