MP temple wall collapses: मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील शाहपूर गावात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान भिंत कोसळून ९ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर चार मुले गंभीर जखमी असून त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगितले जाते. उद्यापासून श्रावण सुरू होत असल्यामुळे शाहपूर गावातील हरदयाल मंदिरात शिवलिंग बनवित असताना सदर दुर्घटना घडली. सागर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे जीर्ण घराची भिंत कोसळून अपघात घडला. ही भिंत ५० वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते.

आज रविवार शाळेला सुट्टी असल्यामुळे अनेक लहान मुले शिवलिंग तयार करण्यासाठी येथे जमले होते. त्याचवेळेस भिंत कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखालून मुलांना बाहेर काढण्यासाठी बुलडोजर आणावे लागले.

हे वाचा >> Wayanad Landslide: इथे माणुसकीही हरवली! भूस्खलन झाल्यानंतर घर सोडलेल्यांच्या घरात चोरी

जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी सांगितले की, भिंत कोसळली तेव्हा लहान मुले मंदिराच्या शेजारी असलेल्या तंबूमध्ये बसले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिंत जीर्ण झाली होती. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सदर दुर्घटना घडली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली नऊ मुलांचा मृत्यू झाला.

मृतांच्या कुटुबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. तसेच मृत मुलांच्या कुटुंबीयांसाठी ४ लाखांची मदत जाहिर केली. तसेच जखमी मुलांवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी मोहन यादव म्हणाले, “सागर जिल्ह्यातील शाहपूर या गावात भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून माझे मन हेलावून गेले. मी जिल्हा प्रशासनाला निर्देश देऊन जखमींवर योग्य ते उपचार करण्यास सांगितले आहे.”

“मृत मुलांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जखमी मुलांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशीही प्रार्थना करतो. ज्यांनी आपली मुलं गमावली त्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. मृत मुलांच्या कुटुंबीयांना चार लाखांची तात्काळ मदत जाहिर करत आहोत”, असेही मुख्यमंत्री मोहन यादव याप्रसंगी म्हणाले.