पाटणा : २०१३ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील राजकीय सभास्थळी झालेल्या ६ जणांचे बळी घेणाऱ्या मालिका बॉम्बस्फोटांच्या संबंधात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) एका विशेष न्यायालयाने बुधवारी १० जणांना दोषी ठरवले.

एनआयएचे विशेष न्यायाधीश गुरविंदर मेहरोत्रा हा आदेश देताना एका आरोपीची पुराव्याअभावी सुटका केली.

‘एनआयएने या प्रकरणी तपासाअंती ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यापैकी एक अल्पवयीन असल्याने त्याचे प्रकरण बाल गुन्हेगार मंडळाकडे सोपवण्यात आले, तर इतरांविरुद्ध खटला चालवण्यात आला. आज एक वगळता इतर आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. १ नोव्हेंबर रोजी न्यायालय शिक्षा जाहीर करेल’, असे विशेष सरकारी वकील लल्लन प्रसाद सिंह यांनी सांगितले.

दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये इम्तियाझ अन्सारी, मुजिबुल्ला, हैदर अली, फिरोझ अस्लम, ओमर अन्सारी, इफ्तेखार, अहमद हुसेन, उमैर सिद्दिकी व अझहरुद्दीन यांचा समावेश असून, फक्रुद्दीन याची न्यायालयाने सुटका केली.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नरेंद्र मोदी यांचे पक्षाच्या ‘हुंकार रॅली’मध्ये भाषण सुरू असताना पाटण्याच्या गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ रोजी हे स्फोट झाले होते. स्फोटात आणि याप्रसंगी झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा बळी गेला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. कुठल्याही दहशतवादी संघटनेने या मालिका स्फोटांची जबाबदारी घेतली नव्हती. मात्र ‘सिमी’ व तिचा नवा अवतार असलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’ या संघटनांचा त्यात सहभाग असल्याचा संशय आहे.