पीटीआय, बनिहाल/ जम्मू : जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या बांधकामाधीन बोगद्याच्या ढिगाऱ्यातून आणखी आठ मृतदेह बाहेर काढण्यात आल्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊ झाली आहे.  जम्मू- काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील खुनी नाल्याजवळील महामार्गावर असलेला ऑडिट टनेल टी३ चा एक भाग गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास काम सुरू होताच ढासळल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात बोगदा टी४ च्या एका टोकावर दरड कोसळल्याचे रामबनच्या उपायुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हवाल्याने सांगितले. खुनी नाल्यानजीक कुठलाही बोगदा ढासळला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 एका मजुराचा मृतदेह शुक्रवारी आढळला, तर दोन स्थानिकांसह तिघांची सुटका करण्यात आली. शनिवारी अनेक तास चाललेल्या शोधमोहिमेत बचाव पथकांनी एक मृतदेह बाहेर काढला. दगडांखालून हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्यांना दोन तासांहून अधिक वेळ लागला. त्यानंतर आणखी सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, उरलेल्या एका जणाचा शोध युद्धस्तरावर सुरू आहे.

 या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ मजुरांपैकी सहा पश्चिम बंगालमधील, दोन नेपाळमधील, तर एक आसाममधील आहे. मरण पावलेल्या दोन स्थानिक मजुरांच्या कुटुंबीयांना रेड क्रॉस निधीतून २५ हजार रुपयांची आणि कंपनीकडून २५ हजार रुपयांची तत्काळ मदत दिली जाणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.  यानंतर, एक मजूर मरण पावला असून तिघांची सुटका करण्यात आले असल्याच्या बातमीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता. आणखी नऊ जण ढिगाऱ्याला अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.