पंजाबमध्ये संचारबंदी; विविध राज्यांमध्ये व्यवहार बंद

देशात करोनाच्या एकूण मृतांची संख्या सोमवारी ९  झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण रुग्णांची संख्या ४६८ असून पश्चिम बंगालमध्ये सोमवारी पहिला बळी गेला आहे. जगातील बळींची संख्या आता १४५०० झाली आहे. पंजाब हे सोमवारी संचारबंदी लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तेथे कुठलीही सूट आता नाही. जीवनावश्यक वस्तूंना यातून वगळण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना र्निबधांचे योग्य प्रकारे  पालन लोक करीत नसल्याची चिंता व्यक्त केल्यानंतर अनेक राज्यांनी संचारंबंदी लागू केली. त्यात, केरळ व महाराष्ट्र यांचाही समावेश आहे. दिल्ली, झारखंड व नागालँड या राज्यांनीही सर्व व्यवहार बंद केले आहेत. देशातील ८० जिल्ह्य़ात आधीच टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यात मुंबई, बेंगळूरु, चेन्नई यांचा समावेश होता. सर्व प्रवासी रेल्वे गाडय़ा व आंतरराज्य बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने त्यांचा बाह्य़ रूग्ण विभाग  बंद केला आहे. २४ मार्चपासून सर्व रुग्णांची नोंदणी बंद करण्यात आली असून गेल्या आठवडय़ात सर्व शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. देशात  ५५ नवीन रुग्ण सापडले असून एकूण संख्या आता ४३३ झाली आहे. कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र व पंजाब या राज्यात प्रत्येकी एक जण मरण पावला होता. आतापर्यंत २४ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने सकाळी दहा वाजता दिलेल्या माहितीनुसार १८३८३ नमुन्यांची तपासणी झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ८९ झाली असून त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दिल्ली २९ ( १ परदेशी), उत्तर प्रदेश २८ (एक परदेशी), राजस्थान २७ (२ परदेशी), तेलंगण २६ (११ परदेशी), कर्नाटक २६ याप्रमाणे रुग्णांची संख्या आहे.

दुबई विमानतळावर सहा भारतीय अडकले

* प्रवास निर्बंधांमुळे सहा भारतीय लोक दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत. त्यांना भारताने लागू केलेल्या प्रवास र्निबधांमुळे विमानात बसण्यास परवानगी नाकारण्यात आली.

* हे लोक युरोपीय देशातून १८ मार्च रोजी दुबईत आले असून ते त्याच दिवशी सायंकाळी अमिरातीतून भारतात येण्यासाठी विमानाने निघणार होते पण त्याच दिवशी भारताने निर्बंध लागू केले आहेत.

गुजरातमध्ये आणखी ११ रुग्ण

* गुजरातमध्ये नवीन करोना विषाणूचे अकरा रुग्ण सापडले असून आता राज्यातील संख्या २९ झाली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

* नवीन अकरा रुग्णांमध्ये पाच पुरुष व सहा महिला आहेत. पाच रुग्ण हे स्थानिक संक्रमणाचे आहेत.

* यातील सहा जणांनी सौदी अरेबिया, फ्रान्स, श्रीलंका, ब्रिटनमध्ये प्रवास करून आलेले आहेत.

* अहमदाबाद १३,बडोदा ६, सुरत ४, गांधीनगर ४, कच्छ व राजकोट प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांची संख्या आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर टीका : महिन्यातील सर्वात काळा दिन म्हणजे अमावस्येच्या दिवशी, रविवारी जनता संचारबंदी संपल्यानंतर लोकांनी शंखनाद  करीत टाळ्या वाजवल्याने विषाणूची मारक क्षमता कमी झाली, असे ट्विट अभिनेता अमिताभ बच्चन यांनी केले असून त्यांच्यावर समाजमाध्यमातून टीका झाली आहे.