करोनापेक्षाही भयंकर आणि जीवघेण्या निपाह विषाणूचा पुन्हा एकदा केरळमध्ये शिरकाव झाला आहे. याआधी तीन वर्षांपूर्वी २०१८मध्ये निपाह विषाणूनं केरळच्या कोझीकोडमध्ये घातलेलं थैमान अजूनही स्थानिकांमध्ये धडकी भरवत असताना आता पुन्हा एकदा या विषाणूनं डोकं वर काढलेलं आहे. ३ सप्टेंबर रोजी कोझिकोडमध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचा निपाह विषाणूची लागण होऊन मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. या ठिकाणी तातडीने केंद्रीत तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आलं. या पथकानं मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना भेट दिली. तसेच, आता आसपासच्या परिसरातील रंबुतन या फळाच्या नमुन्यांसाठी या पथकाची शोधाशोध सुरू आहे.

केंद्रीय पथकाने या मुलाच्या कुटुंबीयांची, तसेच आसपासच्या परिसरात राहणाऱ्या इतर नागरिकांची भेट घेऊन त्यांना थेट कोणत्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करायला हवं, याची माहिती दिली. तसेच, हा मुलगा मृत्यूपूर्वी कुणाच्या संपर्कात आला होता आणि त्याने काय खाल्लं होतं, याचा तपास घेण्याचं काम सध्या हे पथक करत आहे. नागरिकांनी अधिक सतर्क राहून या मुलाप्रमाणे कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेला त्याची माहिती देण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे.

 

रंबुतन फळाचे नमुने!

दरम्यान, या पथकाने आसपासच्या परिसरातील रंबुतन या फळाचे नमुने गोळा करायला सुरुवात केली आहे. ही फळं खाणाऱ्या वटवाघुळांच्या मार्फत या व्हायरसचा फैलाव प्राणी आणि माणसांमध्ये देखील होतो, हे या आधीच्या अनुभवांवरून सिद्ध झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर हे नमुने गोळा करण्याचं काम सुरू आहे. या नमुन्यांवरून नेमक हा विषाणू मुलाच्या शरीरात कुठून आला, याचा शोध घेतला जाणार आहे.

करोनानंतर निपाह व्हायरसचा धोका; केरळमध्ये १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेकडून निपाह या विषाणूविषयी देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा विषाणू फळे खाणाऱ्या वटवाघुळांपासून पसरतो. मनुष्य आणि प्राणी अशा दोन्हींनाही या विषाणूचा सारखाच धोका आहे. श्वसनाशी संबंधित आजार, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे अशी काही लक्षणं याची स्पष्ट करण्यात आली आहेत.

लागण झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती वेगाने खालावते!

कोझिकोडमधील संबंधित भाग तातडीने कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. त्यासोबतच, संपूर्ण कोझिकोड जिल्हा, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोझीकोड जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी या १२ वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधित मुलाच्या शरीरातून नमुने घेण्यात आले होते. जे पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (NIV) येथे पाठवण्यात आले. त्यानंतर मुलाला निपाह विषाणूची व्हायरसची लागण झाल्याते स्पष्ट झाले होते. या विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णाची परिस्थिती वेगाने ढासळते आणि त्याचा मृत्यू ओढावतो. २०१८मध्ये कोझिकोडमध्ये आलेल्या या लाटेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला होता.