कुंभमेळा समाप्तीची घोषणा करणाऱ्या निरंजनी आखाड्याने माफी मागावी!

अन्य आखाड्यांच्या साधूंची मागणी

(संग्रहित छायाचित्र)

देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा समाप्त झाल्याची घोषणा करणाऱ्या निरंजनी आखाड्याने माफी मागावी अशी मागणी शुक्रवारी हरिद्वारमधील अन्य आखाड्यांतील साधूंनी केली. निरंजनी आखाड्याला अशा प्रकारची घोषणा करण्याचा अधिकारच नाही, असे साधूंनी म्हटले आहे.

निरंजनी आखाडा हा कुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या १३ आखाड्यांपैकी एक आखाडा आहे. आमच्यासाठी कुंंभमेळा समाप्त झाल्याची घोषणा गुरुवारी हरिद्वारमध्ये या आखाड्याने केली. मुख्य शाही स्नानाचा कार्यक्रम संपला आहे. आखाड्यातील अनेकांना करोनाची लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे आमच्यासाठी कुंभमेळा समाप्त झाला आहे, असे निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी यांनी म्हटले आहे.

कुंभमेळा अधिकारी किंवा मुख्यमंत्री यांनाच कुंभमेळा समाप्त झाला असे जाहीर करण्याचा अधिकार आहे, असे निर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष महंत धरमदास यांनी म्हटले आहे. निरंजनी आखाड्याने अन्य आखाड्यांच्या अनुमतीविना कुंभमेळा समाप्त झाल्याचे जाहीर करून साधूंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा अक्षम्य गुन्हा केला आहे. त्यामुळे निरंजनी आखाड्याने आखाडा परिषदेची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Niranjani akhada should apologize for announcing the end of kumbh mela abn

ताज्या बातम्या