ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत आहे नीरव मोदी – रिपोर्ट

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि हिरे व्यवसायिक नीरव मोदी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत आहे

(संग्रहित छायाचित्र)

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि हिरे व्यवसायिक नीरव मोदी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत आहे. फायनान्शिअल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याचा माहितीला दुजोरा दिला आहे. नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी असून, फेब्रुवारीपासून फरार आहे.

भारतीय तपास यंत्रणा नीरव मोदीच्या शोधात आहेत. रॉयटर्सने जेव्हा ब्रिटनच्या गृहमंत्रालयाशी संपर्क साधला तेव्हा एखाद्या विशेष व्यक्तीची माहिती देऊ शकत नसल्याचं सांगत माहिती देण्याचं टाळण्यात आलं.

रिपोर्टनुसार, नीरव मोदीने राजकीय छळ झाल्याचा आरोप करत ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. नीरव मोदीव्यतिरिक्त बँकांना हजार कोटींचा चुना लावून पसार झालेला विजय मल्ल्याही लंडनमध्ये असून त्यालाही पुन्हा भारतात आणण्याचा दबाव भारत सरकारवर आहे.

नीरव मोदीने भारतातून पळ काढल्यानंतर भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला होता. तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणेने लूकआऊट नोटीसही जारी केली होती. पोलिसांनी एकूण २५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. यामध्ये नीरव मोदी, मेहुल चोकसी, दोन बँक संचालक आणि नीरव मोदीच्या कंपनीतील तिघांचा समावेश होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nirav modi punjab national bank scam flees to uk

ताज्या बातम्या