मागील काही दिवसांपासून जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुपयाचे मूल्य तब्बल ८३ पैशांनी घसरले होते. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात मोठी पडझड होती. मागील काही दिवसांपासून रुपयाची सातत्याने पडझड होत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रूपया घसरत नसून डॉलर सातत्याने मजबूत होत आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हेही वाचा >>> भाषण करत असताना कार्यकर्ते मारत होते गप्पा, संतापलेल्या भाजपा नेत्याने फेकून दिला माईक, म्हणाले “माझ्यापेक्षा मोठे असाल तर…”

या पत्रकार परिषदेत आगामी काळात रुपयासमोर कोणकोणती आव्हानं आहेत. तसेच या आव्हानांना तोंड देण्यासाठी कोणकोणत्या उपायोजना करण्यात येत आहेत? असा प्रश्न सीतारामन यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “रुपया घसरत नाहीये तर डॉलर सातत्याने मजबूत स्थितीत पोहोचत आहे. इतर चलनांच्या तुलनेत भारतीय चलनाने चांगली कामगिरी केली आहे. अस्थिरतेला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्न करत आहे,” असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

हेही वाचा >>> गोव्यात बिअर महागणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत सार्वकालिक निचांकी पातळीवर आहे. शुक्रवारी रुपया ८ पैशांनी गटांगळ्या खात डॉलरच्या तुलनेत ८२.३२ रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८२.२४ झाले होते. अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन यांनी रुपयाची घसरण होत नसून डॉलर मजबूत स्थितीत पोहोचत आहे, असे विधान केले आहे.