UPSC Success Story IAS Nisa Unnirajan: “स्वप्नांना वयाचं बंधन नसतं आणि जिद्द असेल तर शारीरिक व्याधीही अडसर ठरू शकत नाहीत,” हे केरळच्या निसा उन्नीराजन यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी, दोन लहान मुलींची आई आणि घर-संसाराची जबाबदारी सांभाळत असताना, निसा यांनी २०२४ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत १००० वी रँक मिळवून आयएएस (IAS) होण्याचं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. विशेष म्हणजे, ही किमया त्यांनी आपल्या सातव्या प्रयत्नात साधली आहे.

३५ व्या वर्षी घेतला धाडसी निर्णय

सामान्यतः वयाच्या ३० व्या वर्षानंतर अनेक तरुण ‘यूपीएससी’ची तयारी सोडून देतात किंवा इतर पर्यायांचा विचार करतात. मात्र, निसा यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी या कठीण परीक्षेची तयारी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांना नेहमीच समाजासाठी काहीतरी मोठे करायचे होते. त्यांच्या या प्रवासात त्यांचे पती अरुण (सॉफ्टवेअर इंजिनिअर) आणि त्यांच्या निवृत्त आई-वडिलांनी खंबीर पाठिंबा दिला.

मुलांचा सांभाळ, नोकरी आणि रात्रीचा अभ्यास

निसा यांचे वेळापत्रक कोणत्याही गृहिणीला थक्क करणारे होते. सकाळी ११ वर्षांची नंदना आणि ७ वर्षांची थानवी या आपल्या दोन मुलींना शाळेसाठी तयार करणे, घरकाम आटोपणे आणि उर्वरित वेळेत अभ्यास करणे, असा त्यांचा नित्यक्रम होता. दिवसाची धावपळ संपल्यानंतर त्या रात्री उशिरापर्यंत ‘यूपीएससी’चा अभ्यास करत असत. “माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे शिखर गाठणे अशक्य होते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शारीरिक व्याधीवर मात

निसा यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांची ‘ऐकण्याची समस्या’. ऐकू कमी येणे ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये मोठी अडचण ठरू शकली असती, विशेषतः मुलाखतीच्या वेळी. मात्र, कोट्टायमचे सब-कलेक्टर रंजीत, जे स्वतः अशाच समस्येवर मात करून IAS बनले होते, त्यांच्याकडून निसा यांनी प्रेरणा घेतली. “जर ते करू शकतात, तर मी का नाही?” या एका विचाराने त्यांना प्रत्येक वेळी बळ दिले.

६ वेळा अपयश, पण हार मानली नाही

‘यूपीएससी’चा मार्ग काट्यांनी भरलेला होता. पहिल्या ६ प्रयत्नांमध्ये निसा यांना अपयशाचा सामना करावा लागला. अनेकदा आत्मविश्वास डगमगण्याची भीती असते, पण निसा यांनी प्रत्येक अपयशाला एक ‘धडा’ मानले. त्यांनी कधीही हार मानली नाही आणि आपल्या चुका सुधारण्यावर भर दिला. शेवटी २०२४ मध्ये त्यांच्या सात वर्षांच्या तपश्चर्येला फळ मिळाले.

अभ्यासाची रणनीती

निसा यांनी तिरुवनंतपुरममधील एका कोचिंग सेंटरमधून मार्गदर्शन घेतले असले, तरी त्यांची खरी ताकदी त्यांची स्वतःची रणनीती होती. त्यांनी प्रत्येक विषयाचे लहान भागांत विभाजन केले, नोट्स काढल्या आणि उजळणीवर सर्वाधिक लक्ष दिले. सोशल मीडियावरील यूपीएससी टॉपर्सचे व्हिडिओ पाहून त्या स्वतःला प्रेरित ठेवत असत.