BJP MP Nishikant Dubey Nehru Photos Controversy: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी पंतप्रधान मोदींच्या गळाभेटीची नक्कल केल्यानंतर सुरू झालेला वाद शमायला तयार नाही. या नकलेनंतर भाजपाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जुने फोटो शेअर करून त्यांनीही जागतिक नेत्यांची गळाभेट घेतली असल्याचे सुचवले. त्यानंतर आता दुबे यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेही काही फोटो शेअर केले आहेत. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत असताना राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना काँग्रेसच्या अधिवेशनात मिठी मारली. पंतप्रधान मोदी यांची परराष्ट्र नीति म्हणजे केवळ जागतिक नेत्यांना मिठ्या मारणे, त्यापलीकडे त्यांना काहीही येत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी यातून केली होती.

या टीकेनंतर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि क्युबन क्रांतीचे जनक फिडेल कास्ट्रो यांचा गळाभेट घेतानाचा फोटो शेअर केला. तसेच पॅलेस्टिनी नेते यासिर अराफत यांचीही भेट घेतल्याचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता.

नव्या एक्स पोस्टमध्ये निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “माझ्या ग्रंथालयातील पुस्तकातील नेहरू-गांधी कुटुंबाची काही छायाचित्रे.” या फोटोंमध्ये नेहरू त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित, त्यांची भाची नयनतारा सहगल आणि अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी जॅकलीन केनेडी यांच्यासमवेत दिसत आहेत.

काँग्रेसचे उत्तर

निशिकांत दुबे यांच्या टीकेनंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी याला प्रत्युत्तर दिले. “नराधमांनो, तुमच्या घरातील महिलांनाही तुमच्यापासून सांभाळून राहावे लागेल”, अशी टीका सुप्रिया श्रीनेत यांनी यावरून केली आहे. त्यांनी या फोटोंमध्ये असलेल्या महिलांची नावे दिली. त्या म्हणाल्या, एका फोटोत नेहरूंच्या भगिनी आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांची भाची आहे. तर तिसरा फोटो १९६२ चा असून नेहरूजी जॅकलीन केनेडी यांना होळीनिमित्त रंग लावत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक सिंघवी यांनीही निशिकांत दुबे यांच्या सोशल मीडिया पोस्टवर जोरदार टीका केली. नेहरू-गांधी कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठी काही निवडक फोटो घेऊन त्यांची बदनामी केली जात आहे, असा आरोप सिंघवी यांनी केला.

“अनेक दशकांपासून एक राजकीय कथा रचण्यासाठी जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कुटुंबाला निवडक छायाचित्रे, सूचक विधाने आणि जाणूनबुजून विपर्यास करण्याची मोहीम राबवली जात आहे. निशिकांत दुबे यांचा ताजा प्रयत्न हा बदनामीच्या राजकारणाचे आणखी एक उदाहरण आहे. कौटुंबिक जिव्हाळा असणे म्हणजे काही गडबड नसते आणि जुने फोटो हे गैरकृत्याचा पुरावा नसतात”, अशी टीका अभिषेक सिंघवी यांनी केली.