पीटीआय, नवी दिल्ली

जागतिक पातळीवर अनिश्चितता आणि अस्थिरता असतानाही भारत आत्मविश्वास आणि निर्धाराने प्रगतिपथावर असल्याचे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या ११व्या बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला सर्व २८ राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांनी सांगितले.

विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने देश वाटचाल करत असताना देशाची सामूहिक जबाबदारी अधिकच वाढते, असे मोदी म्हणाले. वाढ आणि निर्यातीच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी भारताने अनेक देशांची मुक्त व्यापार करार केल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले, “या करारांमुळे आपल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांनाही अनेक संधी प्राप्त होतात. त्यांना आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून आणि स्पर्धात्मकता वाढवून जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवणे शक्य होणार आहे.”

देशाच्या लोकसांख्यिकीमुळे आपल्याला मोठी संधी उपलब्ध झाली असून ती गमावणे आपल्याला परवडणार नाही, असा इशाराही मोदींनी यावेळी दिला. तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या क्षमतांचा संपूर्ण वापर करून घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

दर्जेदार शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे याला आपले प्राधान्य असले पाहिजे. विकसित भारताच्या दिशेने वाटचालीला सक्षम तरुण चालना देतील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मुख्यमंत्री मोदींच्या भेटीला

निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला आलेल्या विविध राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा समावेश होता. योगी आदित्यनाथ यांनी या भेटीत आपल्या राज्याचे विविध मुद्दे उपस्थित केले. ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जावा अशी मागणी केली. पंतप्रधानांबरोबर आपली सकारात्मक चर्चा झाली असे डी. के. शिवकुमार यांनी एक्सवर लिहिले. विजय आणि रेड्डी यांनीही मोदींबरोबर सदिच्छा भेट घेतल्याचे आणि राज्याशी संबंधित मुद्दे उपस्थित केल्याचे सांगितले.