Nitin Gadkari addresses concerns over E20 fuel mileage : “पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचे कॅलरीफिक मूल्य कमी असल्यामुळे, इंधनात इथेनॉलचे प्रमाण वाढल्यास सरासरी मायलेज थोडं कमी होऊ शकतं. मात्र, बहुतांश वापराच्या बाबतीत हा परिणाम अगदी किरकोळ असेल”, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी’द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना स्पष्ट केलं. सोशल मीडियावर फिरत असलेले वाहनांच्या नुकसानीचे दावे चुकीचे असून तो एका नियोजनबद्ध खोट्या प्रचाराचा भाग आहे, असंही ते म्हणाले.
जुन्या गाड्यांचे भाग बदलणार
पुणे येथील चाचणी प्रयोगशाळा एआरएआय आणि वाहन उत्पादकांनी घेतलेल्या अनेक चाचण्यांच्या मंजुरीनंतरच गेल्या वर्षी देशभरात E20 मिश्रण (२०% इथेनॉल आणि ८०% पेट्रोल) लागू करण्यात आलं होतं, असं गडकरींनी स्पष्ट केलं. जुन्या गाड्यांच्या काही भागांवर होणाऱ्या किरकोळ परिणामांबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, वाहन उत्पादकांना सर्व्हिसिंगदरम्यान ते भाग बदलून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. “E20 इंधनामुळे नुकसान झालेली एक तरी गाडी मला दाखवा. सोशल मीडियावर जे काही फिरत आहे, तो एका नियोजनबद्ध खोट्या प्रचाराचा भाग आहे”, असं त्यांनी सांगितलं.
मायलेजच्या समस्येवर गडकरी म्हणाले, “बघा, यात दोन गोष्टी आहेत, पहिली म्हणजे इथेनॉल आणि पेट्रोलच्या कॅलरीफिक मूल्यांमधील फरक आहे. पण मायलेज हे ड्रायव्हिंगच्या परिस्थितीवरही अवलंबून असतं, विशेषतः दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये, जेथे वाहतुकीच्या परिस्थितीमुळे वाहने कमी गिअरमध्ये चालवावी लागतात… एआरएआय (ARAI) च्या अहवालानुसार, विशेषतः फ्लेक्स-फ्यूएल इंजिनसह तयार केलेल्या वाहनांच्या मायलेज कार्यक्षमतेत कोणतीही समस्या नाही. म्हणूनच आम्ही फ्लेक्स-इंजिन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहोत.”
…तर मायलेजमध्ये फरक दिसणार
“दिल्ली ते गुरुग्राम दरम्यानच्या थांबत-चालत जाणाऱ्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही सतत ब्रेक लावता. मात्र, तुम्ही १०० किमी प्रतितास या एकाच वेगाने सलग गाडी चालवली, तर तुम्हाला मायलेजमध्ये काहीसा फरक दिसू शकतो”, असं गडकरी म्हणाले. इंजिन खराब होत असल्याच्या दाव्यांवर गडकरी म्हणाले की, त्यांनी कंपन्यांना अशा काही प्रकरणांची तपासणी करण्यास सांगितलं होतं. त्यातून भेसळयुक्त इंधन यासाठी कारणीभूत असल्याचं आढळून आलं. फ्लेक्स इंजिनमधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असून, सामग्रीच्या सुसंगततेच्या बाबतीत त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत, असं गडकरींनी सांगितलं.
एकही गाडी नादुरुस्त झालेली नाही
“सर्व्हिसिंगसाठी जाणाऱ्या जुन्या गाड्यांचे वॉशर्स पूर्वी धातूचे असायचे. आता ते रबरचे आहेत. सर्व्हिसिंगदरम्यान ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त पैसे न घेता ते वॉशर्स बदलून देण्याच्या सूचना आम्ही वाहन उत्पादकांना दिल्या आहेत. माझ्या माहितीनुसार, एकही गाडी नादुरुस्त झालेली नाही. कामगिरीचा विचार केला तर इथेनॉल हे अधिक सरस असल्याचं सिद्ध झालं आहे; त्याचे अँटी-नॉकिंग गुणधर्म खूप चांगले आहेत आणि ऑक्टेन नंबर जास्त आहे.”
फ्लेक्स-फ्यूएल इंजिन तंत्रज्ञानासह टाटा मोटर्स, महिंद्रा, ह्युंदाई, टोयोटा किर्लोस्कर आणि मारुती सुझुकी यांच्यासह जवळपास डझनभर कंपन्या फ्लेक्स मॉडेल्स आणत आहेत, असं मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ब्राझील १९७० पासून २७ टक्के इथेनॉल-पेट्रोल मिश्रण वापरत आहे, जिथे होंडा आणि ह्युंदाईच्या फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असलेल्या गाड्या कोणत्याही समस्येशिवाय इथेनॉलवर चालत आहेत. “इथेनॉलची किंमत अंदाजे ७५ रुपये प्रति लीटर आहे हे लक्षात घेता, जनतेला वेगवेगळ्या किमतीत विविध मिश्रणांचे पर्याय देणं हे आमचं ध्येय आहे”, असं गडकरींनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं.
