Nitin Gadkari Auto Industry statement : भारताच्या ऑटोमोटिव्ह (वाहन) उद्योगात जगात अव्वल बनण्याची क्षमता असून हा उद्योग आर्थिक विकासाचा मुख्य चालक आहे, असं महत्त्वाचं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. एचटी ऑटो लीडरबोर्ड अवॉर्ड्स २०२६ कार्यकर्माच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
“हा उद्योग अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या उद्योगाला जगात पहिल्या क्रमांकावर नेण्याचे माझे स्वप्न आहे. सध्या पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. भारत तिसऱ्या स्थानावर आहे”, असं गडकरी म्हणाले. भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राचे देशाच्या आर्थिक विकासात आणि औद्योगिक परिसंस्थेत केंद्रीय स्थान असल्याचे अधोरेखित करताना, हे क्षेत्र अर्थव्यवस्थेत २२.७५ लाख कोटींचे योगदान देते, असं त्यांनी नमूद केलं.
भारताने इथेनॉल-आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्यात केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकत केंद्रीय मंत्री म्हणाले, “इथेनॉल अर्थव्यवस्था आधीच खूप यशस्वी झाली आहे. २०२२ पासून, आपल्याकडे चार कोटी चारचाकी आणि २० कोटी दुचाकी वाहने ई२० पेट्रोलवर चालत आहेत. आम्हाला याबद्दल एकही तक्रार मिळालेली नाही. येथे बसलेल्या बऱ्याच लोकांच्या वाहनांमध्येही ई२० पेट्रोल असेल. काही तक्रार आहे का? कोणतीही तक्रार नाही”, असं ते म्हणाले.
पश्चिम आशियातील संकटामुळे पुरवठा खंडित झाला असून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, अशा परिस्थितीत बायोफ्युएलचा (जैवइंधन) हा आग्रह अधिक महत्त्वाचा ठरतो. टप्प्याटप्प्याने लागू केल्यानंतर, एप्रिल २०२६ पासून देशातील इंधन पंपांवर (प्रीमियम प्रकार वगळता) ई२० पेट्रोल हा एकमेव पेट्रोलचा प्रकार उपलब्ध झाला आहे. इथेनॉलची निर्मिती ऊस, मका आणि अतिरिक्त तांदूळ यांसारख्या कृषी उत्पादनांपासून केली जाते. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढीपासून सुरक्षित असलेल्या आणि स्थिर, पूर्व-निश्चित दरांवर खरेदी केलेल्या देशांतर्गत उत्पादित इथेनॉलच्या मिश्रणामुळे ग्राहकांना प्रति लीटर पेट्रोलसाठी कमी पैसे मोजावे लागत आहेत.
