Nitin Gadkari on Waste to Hydrogen Fuel Tech: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले की, दिल्लीतील बसेस एके दिवशी हायड्रोजनवर चालू शकतील. महानगरपालिकेने वेगळ्या केलेल्या कचऱ्याच्या माध्यमातून हा हायड्रोजन तयार केला जाईल. ही संकल्पना जाहीर करताना त्यांनी कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा आपला मानस बोलून दाखवला.
दिल्ली भाजपातर्फे आयोजित केलेल्या एका युवक परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी हा विचार व्यक्त केला. “महानगरपालिकेने गोळा केलेल्या कचऱ्यावर बायोडायजेस्टरद्वारे प्रक्रिया करून हायड्रोजन वायू तयार करता येईल, ज्याचा उपयोग सार्वजनिक वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो”, असे नितीन गडकरी म्हणाले असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, “हा कचरा वेगळा करून बायोडायजेस्टरद्वारे हायड्रोजन निर्मितीसाठी वापरला जाईल. दिल्लीतील बसेस या इंधनावर चालतील. हे सर्व शक्य आहे.” केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भविष्यातील वाहतूक तंत्रज्ञानाबद्दलही भाष्य केले. भविष्यात असा काळ येईल जेव्हा हायड्रोजन निर्मितीसाठी पाण्याचा वापर केला जाईल. यातून तयार झालेला हायड्रोजन वाहने चालविण्यासाठी वापरला जाईल.
या कल्पनेवर काहींनी शंकाही उपस्थित केली. त्यावर बोलताना गडकरी म्हणाले, अनेक लोक याबाबत विचारतात की, हे कसे शक्य होईल. पण गेल्या ५० वर्षांत मी जे जे काही बोललो, ते प्रत्यक्षात झाले नाही, असे काही आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.
कचऱ्यापासून महामार्ग निर्मिती
पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कचऱ्याचा वापर होत असल्याबद्दल नितीन गडकरी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, दिल्लीच्या डम्पिंग ग्राऊंडमधील सुमारे ८० लाख टन कचरा द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात वापरण्यात आला आहे. २०२७ पर्यंत देशभरातून कचरा निर्मूलन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
घनकचरा व्यवस्थापनाचे अनेक आर्थिक फायदे असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, त्यांच्या मतदारसंघातील महानगरपालिकेने प्रक्रिया केलेले सांडपाणी विकून वर्षाला सुमारे ३२५ कोटी रुपये कमावले.
ई२० पेट्रोलवर काय म्हणाले?
देशात ई२० म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वाढल्याने, इथेनॉलच्या अतिरिक्त मिश्रणाच्या जुन्या वाहनांवरील परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता कमी झाल्याच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे समस्या निर्माण झालेली एक गाडी दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी दिले.
विकसित भारत परिषदेत बोलत असताना गडकरी म्हणाले, जीवाश्म इंधनावर भारत अवलंबून असल्यामुळे आपल्याला दरवर्षी २२ लाख कोटी खर्च करावे लागतात. हे आर्थिक ओझे असून यातून पर्यावरणाचाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच देशाच्या प्रगतीसाठी स्वच्छ ऊर्जेचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत खोटे दावे पसरवले जात असून पैसे देऊन या मोहिमा चालविल्या जात आहेत, असाही दावा त्यांनी केला.
नितीन गडकरी जाणूनबुजून लक्ष्य?
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांनी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इथेनॉलची नकारात्मक बाजू समाज माध्यमावर मांडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गडकरी यांनी यापूर्वी परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयासोबत जलशक्ती, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचीही जबाबदारी सांभाळली होती. या खात्याचे काम करतानाही त्यांनी छाप पाडली. गेल्या बारा वर्षातील त्यांचे काम बघता केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर करणे शक्य नाही. त्यामुळे इथेनॉल मुद्दा पुढे करीत गडकरींच्या विरोधातील गट त्यांना अडगळीतले कमी महत्त्वाचे खाते मिळावे, असा प्रयत्न करीत असल्याचीही चर्चा आहे.
