Nitin Nabin takes charge as BJP president : नितीन नबीन यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदाची औपचारिकपणे सूत्रे स्वीकारली . ४५ वर्षीय नितीन नबीन यांनी सध्या केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची जागा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा बदल होत आहे.
अधिकृतपणे पदभार स्वीकारण्यापूर्वी, नवीन यांनी दिल्लीतील अनेक प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली. झंडेवालन मंदिर, वाल्मिकी मंदिर आणि कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरांना भेट देऊन त्यांनी गुरुद्वारा बांगला साहिबचंही दर्शन घेतलं. धार्मिक स्थळांना भेट देताना त्यांच्यासोबत दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि दिल्लीचे मंत्री परवेश साहेब सिंग वर्मा होते.
कोण आहेत नितीन नबीन?
१) नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० ला बिहारमधील पाटणा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बांकीपूरचे माजी आमदार होते.
२) नितीन नबीन यांनी २००६ मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर बांकीपूर येथून पोट निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले.
३) २०१०, २०१५ आणि २०२० या तिन्ही निवडणुकांमध्ये ते विजयी झेल. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीतही ते पाचव्यांदा आमदार झाले. बांकीपूर मतदार संघात त्यांना ९८ हजार २९९ मतं मिळाली.
४) २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीन नबीन यांना नितीश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं.
५) नितीन नबीन हे सध्या बिहारचे बांधकाम मंत्री आहेत
६) २०२१ ते २०२२ या कालावधीतही ते याच विभागाचे मंत्री होते
७) नितीन नबीन यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
नितीन नबीन राष्ट्रीय अध्यक्ष होतील याचा अंदाज आधीच बांधला गेला होता जो खरा ठरला
सहा वर्षांपूर्वी जे. पी. नड्डांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली होती. त्याआधी नड्डांना भाजपाने कार्यकारी अध्यक्ष केले होते. त्यानंतर अधिकृतपणे केंद्रीय स्तरावरील संघटनात्मक निवडणूक झाल्यानंतर नड्डांची अध्यक्षपदी निवड केली गेली. ज्यानंतर ४५ वर्षीय नितीन नबीन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. नितीन नबीन हे जे. पी. नड्डांचा कित्ता गिरवतील आणि त्यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही सूत्रे दिली जातील असा अंदाज बांधला जात होता, जो खरा ठरला आहे. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता नितीन नबीन हे जे. पी. नड्डांकडून पदभार स्वीकारणार आहेत.
