भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत पदक पटकावले. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. कांस्यपदक पटकावल्यानंतर टीमवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग सोबत फोनवर बोलून शुभेच्छा दिल्या. तसेच ट्विट करत हा ‘नवा भारत’ असल्याचं म्हटलंय. यावरूनच कृषी कायद्यांना विरोध करत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.

केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. यासाठी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन देखील सुरू आहे. आंदोलन करणारे लोक हे शेतकरी नाहीत ते देशद्रोही आहेत, अशी टीका अनेक भाजपा नेत्यांनी केली होती. हीच बाब हेरत भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक पटकावल्यानंतर राऊतांनी निशाणा साधलाय. “ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय चमूत ४०% पंजाबी आणि हरियाणवी आहेत. त्यांनी पराक्रम गाजवला तर भक्तांच्या मते ते कट्टर भारतीय आहेत. पण शेती कायद्यांना विरोध करणारे त्यांचे आईवडील देशद्रोही?” असे ट्विट नितीन राऊत यांनी केले आहे.

हॉकी संघातील खेळाडू..

भारतीय संघात कर्णधार मनप्रीत सिंग, गोलकीपर पीआर श्रीजेश, हरमनप्रीत सिंग, रुपींदर पाल सिंग, सिमरनजित सिंग, सुरेंदर कुमार, बिरेंद्र लाकरा, अमित रोहिदास, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, निलकांता शर्मा, समशेर सिंग, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग,गुरजंत सिंग आणि ललीत कुमार उपाध्याय यांचा समावेश होता.