पूर्णिया (बिहार) : ‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपचा विश्वासघात केला,’’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला. बिहारमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पूर्णिया येथील पक्ष मेळाव्यात शहा म्हणाले, की नितीशकुमार यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. म्हणून त्यांनी जातीपातीच्या राजकारणासाठी समाजवादाचा त्याग केला. त्यांनी २०१४ मध्ये असेच केले होते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारची जनता या महाआघाडीचा पाडाव करेल. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप बिहारमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल.

आमचा स्वार्थ आणि सत्तेपेक्षा सेवा आणि विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे. नितीशकुमार यांनी पंतप्रधान होण्याच्या हव्यासापोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आता ते राजद आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.

खुर्चीला आग लागू नये, हेच धोरण!

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण आहे, की कुठल्याही परिस्थितीत माझ्या खुर्चीला आग लागू नये, अशी टीकाही अमित शहा यांनी या वेळी केली. शहा सध्या बिहारच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते येथे खासदार, आमदार आणि पक्षाच्या विविध विभागांच्या नेत्यांच्या बैठका घेणार आहेत. गेल्या महिन्यात येथे झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर भाजपची सत्ता गेल्यानंतर शहा प्रथमच बिहार दौऱ्यावर आले आहेत.