Nitish Kumar Bihar CM resignation news: राज्यसभेच्या निवडणुकीत बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीश कुमार राज्यसभेवर गेले खरे पण, त्यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. दरम्यान, “पुढील आठवड्यात १० एप्रिल रोजी नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील”, अशी माहिती जेडी(यू)च्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

१० एप्रिल रोजी नितीश कुमार देणार राजीनामा?

“राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर १० एप्रिल रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देतील. त्यानंतर काही दिवसांनी बिहारमधील नवीन मुख्यमंत्र्याच्या निवडीची प्रक्रिया सुरु होईल”, अशी जेडी(यू)च्या एका वरिष्ठ नेत्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली आहे. “नितीश कुमार यांनी बिहार विधानपरिषदेचा राजीनामा दिला आहे. आणि राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. आता ते काही दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल”, असे जेडी(यू) च्या नेत्यांनी वृत्तपत्राला माहिती देताना म्हटले आहे.

राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर राजीनाम्याची प्रक्रिया

“नवीन मुख्यमंत्र्याची निवड एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत होईल. राज्यसभेची शपथ घेण्यासाठी नितीश कुमार ०९ एप्रिलला दिल्लीत जातील. तिथून माघारी आल्यानंतर राजीनाम्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. नितीश कुमार राजीनामा देण्यासाठी सकारात्मक असून, त्यांच्यावर कोणताही ताण दिसत नाही”, असे जेडी(यू)च्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, नितीश कुमार यांची गेल्या महिन्यातच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

पक्षाची महत्वाची बैठक होणार

पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस पक्षाची नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील वाटचाल आणि काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती जेडी(यू)च्या नेत्यांनी दिली. नितीश यांचे पूत्र निशांत कुमार यांनी नुकताच पक्षात प्रवेश केला आहे. पक्षातील त्यांची भूमिका आणि पद याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.