भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनी गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. विजयवर्गीय यांनी नितीश कुमार यांची तुलना परदेशी महिलेशी करताना केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मागील आठवड्यामध्येच नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपासोबतची युती तोडत राष्ट्रीय जनता दल आणि इतर सहकारी पक्षांसोबत सत्ता स्थापन केली. त्याच पार्श्वभूमीवर विजयवर्गीय यांनी हे विधान केलं आहे.

इंदौरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना नितीश कुमार यांच्यासंदर्भात विजयवर्गीय यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जेव्हा संत्तांतर झालं तेव्हा आपण परदेशात होतो असं सांगितलं. मात्र पुढे लगेच त्यांनी खोचक शब्दांमध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. “बिहारमध्ये ज्या दिवशी सत्तांतर त्या दिवशी मी परदेशात होतो. बिहारमधील सत्तापालट झाल्याचं ऐकून एकाने मला सांगितलं की हे आमच्याकडे असं होतं असतं. मुली कधीही बॉयफ्रेण्ड बदलतात. बिहारच्या मुख्यमंत्र्यांचीही अशीच परिस्थिती आहे. कधी कोणाचा हात पकडतील. कधी होणाचा हात सोडतील सांगता येत नाही,” असं विजयवर्गीय म्हणाले.

बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी ९ ऑगस्ट रोजी भाजपाला पुन्हा धक्का दिला. भाजपाशी काडीमोड घेत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देऊन राष्ट्रीय जनता दलासह (राजद) अन्य घटकपक्षांच्या महाआघाडीचे नेते म्हणून सत्तास्थापन केली. नव्या सरकारचा शपथविधी १० ऑगस्ट रोजी दुपारी पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजपाप्रणीत  ‘रालोआ’  सरकारमध्ये मुख्यमंत्री असूनही राजकीय कोंडमाऱ्यामुळे नितीशकुमार नाराज होते.  त्यामुळे ते भाजपाची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. नीति आयोगाच्या बैठकीकडे नितीशकुमार यांनी पाठ फिरवल्याने या चर्चेला वेग आला आणि संयुक्त जनता दलाच्या मंगळवारच्या बैठकीत काडीमोडावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  भाजपाने आधी चिराग पासवान आणि नंतर आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून ‘जदयू’ला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याने ‘रालोआ’तून बाहेर पडणे योग्य असल्याची भूमिका नितीशकुमार यांनी या बैठकीत मांडली.

‘जदयू’च्या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी थेट राजभवन गाठून राज्यपाल फगू चौहान यांच्याकडे ‘रालोआ’च्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता.  त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी जाऊन राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासह काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. अर्ध्या तासाने नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे घटक पक्षांच्या नेत्यांसह राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी महाआघाडी म्हणून सत्तास्थापनेचा दावा केला. नितीशकुमार हे सात पक्षांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणार असून, ते आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत  याआधी २०१७ मध्ये नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली होती.