Bihar Politics Latest News: बिहारच्या राजकीय पटलावर मोठी घडामोड येत्या दोन दिवसांत घडण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समोर आली आहे. नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून, केवळ नितीश यांची सही बाकी आहे, असे सूत्रांनी म्हटलंय. नितीश कुमार ०५ मार्च रोजी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

‘जेडीयू’मध्ये हालचालींना वेग

नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठीची चर्चा जवळपास पूर्ण झाल्याची माहिती जनता दल (युनायटेड) पक्षाशी निगडीत सूत्रांनी दिली आहे. पक्षात यावरुन हालचालींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाल्यानंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि नितीश कुमार यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. प्रदिर्घ झालेल्या या बैठकीत राज्यसभा निवडणूक आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. केंद्रीय मंत्री लल्लन सिंग याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी पटनामध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणार?

नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यास नवा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतच्या चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत. नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यास भारतीय जनात पार्टी मुख्यमंत्रीपदावर दावा करु शकते, असा अंदाज राजकीय सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जदयुमधून रामनाथ ठाकूर यांचे नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित असून, दुसरा उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स कायम आहे.

समृद्धी यात्रा लांबणीवर पडण्याची शक्यता

मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ०८ मार्चपासून सुरु होणारी समृद्धी यात्रा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यात्रेबाबतची अनिश्चितता लक्षात घेता नितीश यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभेच्या माध्यमातून नितीश केंद्रात जाण्याची चर्चा बिहारमध्ये वेगाने होत आहे. पण, पक्षाकडून याबाबत कोणतेही वक्तव्य अथवा घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.