मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाला झटका देता बिहारमध्ये राजदसोबत सत्तास्थापन केली. भाजपाला बिहारमधील सत्तेतून खाली खेचण्यासाठी तेजस्वी यादव यांचाही मोठा हातभार होता. त्यात आता राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या एक विधानाने सर्वांच्या भूवया उंचवल्या आहेत. राजदच्या अध्यक्षपादासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीचा अर्ज लालू प्रसाद यादव यांनी दाखल केला आहे. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लालू प्रसाद यादव म्हणाले, “भाजपाला उखडून टाकायचे असून, सर्व विरोधीपक्षाला बरोबर आणयचं आहे. तेजस्वीने बिहार संभाळावे तर, नितीश कुमारांनी दिल्लीत जावे, असं मला वाटतं. सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करायला गेलो होतो, फोटो काढण्यासाठी नाही. त्यांच्याशी चांगली बैठक झाली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींना भेटणार आहे,” असेही लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं.

हेही वाचा – पीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा

दरम्यान, पीएफआय संघटनेवरील कारवाईवरही लालू प्रसाद यादव यांनी ट्विट केलं आहे. “पीएफआयसारख्या द्वेष पसरवणाऱ्या अन्य संघटनांवर सुद्धा बंदी घातली पाहिजे, ज्यात आरएसएस सुद्धा आहे. पहिल्यांदा आरएसएसवर बंदी घालण्यात यावी. आरएसएसवर यापूर्वी दोन वेळा बंदी घालण्यात आली होती. सर्वात पहिल्यांदा लोहपुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांनी आरएसएसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता,” असा हल्लाबोल लालू प्रसाद यादव यांनी केला आहे.