बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी शुक्रवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पाचव्यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारानंतर लगेचच मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे त्याच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, नितीशकुमार याच्या शपथविधीला सर्वच मोदी विरोधकांनी हजेरी लावून एकजुटीचे दर्शन घडविले. त्याचवेळी देशाच्या राजकीय पटलावर नव्या समीकरणांची नांदी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नितीशकुमार यांच्या शपथविधीला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा, जदयूचे अध्यक्ष शरद यादव, राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, ओमर अब्दुल्ला आदी नेते उपस्थित होते.
केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. पाटण्यातील गांधी मैदानावर झालेल्या या सोहळ्यात नितीशकुमार यांनी हिंदीतून शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल रामनाथ गोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.