नवी दिल्ली : बिहारचे पायउतार होणारे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे गृहमंत्री व भाजपचे नेते सम्राट चौधरी तसेच, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय या दोन नेत्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष नितीश कुमार १४ एप्रिल रोजी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याने २००५ पासून सुरू झालेले ‘नितीशयुग’ संपुष्टात येणार आहे. त्याच दिवशी ‘एनडीए’च्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, नव्या मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार आहे. १५ एप्रिल रोजी बिहारमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीश कुमार यांनी ३० मार्चला बिहारच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते पहिल्यांदाच राज्यसभेचे सदस्य बनले असून त्यापूर्वी नितीश कुमार लोकसभेचे खासदारही होते. अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते.

हरिवंश पुन्हा उपसभापती?

जनता दलाचे (संयुक्त) नेते हरिवंश राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेचे खासदार बनले आहेत. हरिवंश यांना शुक्रवारी सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली. हरिवंश नुकतेच वरिष्ठ सभागृहातून निवृत्त झाले असून, त्यांना जनता दलाने राज्यसभेच्या निवडणुकीत बिहारमधून उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या जागी नितीशकुमार निवडून आले.

मात्र, भाजपने हरिवंश यांनी राष्ट्रपतीनियुक्त सदस्य केल्याने ते तिसर्यांदा राज्यसभेचे उपसभापती होऊ शकतात. राष्ट्रपतीनियुक्त सदस्याला राष्ट्रपती निवडणुकीव्यतिरिक्त इतर सर्व संसदीय प्रक्रियेमध्ये सहभागी होता येते. त्यामुळे हरिवंश उपसभापतीचे पदही सांभाळू शकतात.

मी पूर्वी इथंच तर होतो!

नितीश कुमार यांना राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी संसदेच्या आपल्या दालनामध्ये सदस्यत्वाची शपथ दिली.शपथ घेतल्यानंतर संसदेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधताना नितीश कुमार, ‘मी पूर्वी इथंच तर होतो’, असे म्हणाले.