नितीश कुमार हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत. मात्र, सध्या भाजपाकडून नितीश यांची प्रतिमा मोदींपेक्षा खुजी करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप संयुक्त जनता दलाचे (जदयू) नेते आणि बिहार विधानसभेचे माजी अध्यक्ष नारायण चौधरी यांनी केला आहे. नितीश ‘एनडीए’मध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) परत गेल्यापासून हा सर्व प्रकार सुरू आहे. त्यामुळे आता जदयूचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असणाऱ्या बलेश्वर प्रसाद बिंद यांचाही समावेश आहे, असा दावा नारायण चौधरी यांनी केला. नारायण चौधरी यांनी मंगळवारी लालू प्रसाद यादव यांचेही समर्थन केले होते. लालूंवर दुसऱ्यांदा चारा घोटाळ्याचा आरोप केल्याने त्यांना उलट राजकीय फायदा मिळेल, असे त्यांनी म्हटले होते.
मात्र, जदयूने नारायण चौधरी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नारायण चौधरी ज्या नेत्यांचा उल्लेख करत आहेत त्या सर्वांची पक्षविरोधी कारवायांमुळे हकालपट्टी करण्यात आल्याचे जदयूने सांगितले. चौधरी हे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी अशाप्रकारची विधाने करत आहेत. त्यामुळे पक्ष त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही. गया येथील पक्षाचे स्थानिक नेत्यांची हकालपट्टीच झाली आहे. मात्र, चौधरी या सगळ्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे जदयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी म्हटले.
नारायण चौधरी यांनी जदयूच्या या आरोपांचेही खंडन केले. त्यांनी म्हटले की, जदयूच्या नेतृत्त्वाकडून नाराज कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर पक्षाने संबंधित नेत्यांची हकालपट्टी केली असती तर त्याची बातमी कुठेच ऐकायला का मिळाली नाही, असा सवाल चौधरी यांनी विचारला.