Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एनडीए प्रचंड मोठं बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत आहे. बिहार विधानसभेत एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे एनडीएचे कार्यकर्ते मोठा जल्लोष करत आहेत. दरम्यान एनडीए बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र स्पष्ट होत असतानाच बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

या घडामोडी सुरू असतानाच बिहारच्या मुख्यमंत्री पदाबाबत जेडीयूने मोठा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. कारण एनडीए प्रचंड मोठं बहुमत मिळत असल्याचं दिसताच जेडीयूने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट करत थेट बिहारचं मुख्यमंत्री कोण होणार? हेच जाहीर करून टाकलं. मात्र, त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या येताच काही वेळात जेडीयूने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील ती पोस्ट डिलीट केली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

जेडीयूने काय पोस्ट केली होती?

“न भूतो न भविष्यती…, नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते आणि राहतील”, अशा आशयाची पोस्ट जेडीयूने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर केली होती. मात्र, या पोस्टमुळे एनडीएमध्ये खळबळ उडाली आणि त्यानंतर काही वेळात जेडीयूने ही पोस्ट डिलीट केली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

JDUs post

नितीश कुमारांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून का जाहीर केला नाही? तावडेंचं उत्तर

बिहारच्या निवडणुकीत भाजपा आणि एनडीएचा दणदणीत विजय झाला. बिहारचे भाजपाचे निवडणूक प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी या यशामागे काय मेहनत घेतली होती ते सांगितलं. तसंच बिहारमध्ये नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून का जाहीर केला नव्हता याचंही उत्तर दिलं आहे.

विनोद तावडे नेमकं म्हणाले की, जर प्रामाणिकपणे संवाद ठेवला तर आघाडी आणि युतीच्या राजकारणात विश्वास असतो. आम्ही सातत्याने नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाशी चर्चा सुरु ठेवली होती. तसंच चिराग पासवान, उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षांशीही आम्ही बोलत होतो. जो संवाद होता तो संवाद लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि जागा वाटपाच्या वेळी कामाला आला. सगळ्यांच्या मधला संवाद होता. त्यासाठी आम्ही एनडीएचे संमेलनं घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्तम संवाद होता. कारण जेव्हा कार्यकर्ते जेव्हा नाराज होतात तेव्हा त्याचा फटका बसतो. पण आम्ही यावेळी एक बॉडिंग तयार केलं असं विनोद तावडे म्हणाले.

नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून का जाहीर का केला नाही असं विचारलं असता विनोद तावडे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आम्ही ना राजस्थानमध्ये दिला होता, ना मध्य प्रदेशात, ना महाराष्ट्रात ना बिहारमध्ये. विरोधकांचा डाव होता की नितीश कुमार आजारी आहेत असं म्हणायचं आणि यांनी आजारी माणसाला मुख्यमंत्री केलं बघा असं म्हणायचं आणि अपप्रचार करायचा होता. विरोधकांचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही हे केलं होतं, असं विनोद तावडे यांनी म्हटलं.