तेलंगणातील निझामाबादमध्ये गर्भवती बहिणीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तिच्या भावाने तिच्या पतीची भररस्त्यात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ वर्षीय जी. संतोष याने बहिणीचा पती सी. हरी बाबू याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर संतोषने सेल्फी व्हिडिओद्वारे बहिणीच्या हत्येचा बदला घेतल्याचा दावा केला असून, आपण पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचेही त्याने म्हटले. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
बहिणीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक, नंतर जामीन
२० वर्षीय वैष्णवीचा १७ मार्च रोजी जगतियाल जिल्ह्यातील तिच्या माहेरच्या घरी मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती हरी बाबू हा प्रमुख संशयित होता. पोलिसांनी काही दिवसांनी त्याला अटक केली. मात्र, जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर हरी बाबू उपजीविकेसाठी मक्याची विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, हरी बाबू निझामाबाद शहरातील शिवाजीनगर भागातील एका पाणीपुरीच्या ठेल्याशेजारी उभा असताना ही घटना घडली. तो पाणी पीत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक पांढरी कार रस्त्यावर थांबल्याचे दिसले. त्यानंतर एक व्यक्ती हातात कोयता घेऊन रस्ता ओलांडून हरी बाबूकडे धावत जाताना दिसली. त्याने हरी बाबूच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले, असे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. हल्ल्यानंतर हरी बाबू रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.
बहिणीच्या हत्येचा बदला
गुरुवारी रात्री उशिरा व्हायरल झालेल्या सेल्फी व्हिडिओमध्ये संतोष म्हणतो, “मीच हरी बाबूची हत्या केली असून माझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेतला आहे.” न्याय मिळावा यासाठी अनेक महिने वाट पाहिल्यानंतर आपण हे पाऊल उचलल्याचेही त्याने व्हिडिओमध्ये म्हटल्याचे सांगितले जात आहे.
बहिणीने मृत्यूपूर्वी जाहीर केली होती गर्भधारणेची बातमी
वैष्णवी आणि हरी बाबू यांचा विवाह तिच्या मृत्यूच्या सुमारे वर्षभरापूर्वी झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, हुंड्याच्या सततच्या मागणीला कंटाळून वैष्णवी आपले सासर सोडून माहेरी निघून आली होती. त्यानंतर तिला परत नेण्यासाठी आलेल्या हरी बाबूने त्याच रात्री तिच्या माहेरी मुक्काम केला होता, पण दोघे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले होते. दरम्यान, आपल्या मृत्यूच्या काही तास आधी वैष्णवीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपण आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती.
गर्भधारणेची माहिती देणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिच्या आईला वैष्णवी जखमी अवस्थेत आढळली. तिच्या छातीवर आणि मानेवर चाकूने वार केल्याच्या जखमा स्पष्ट दिसत होत्या आणि तिचा गळा दाबून खून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला. या भीषण घटनेनंतर हरी बाबू घरातून फरार झाला होता. दरम्यान, वैष्णवीचा छळ करून हुंड्यासाठी तिच्यावर सतत दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.
सोशल मीडियावरील लोकप्रियतेवरूनही वाद?
वैष्णवी तिच्या आयुष्याशी आणि वैवाहिक नात्याशी संबंधित व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर पोस्ट करत होती. तिच्या युट्युब चॅनेलवर ५० हजारांहून अधिक सब्सक्राइबर्स होते. तिच्या ऑनलाइन लोकप्रियतेमुळेही हरी बाबू नाराज असल्याचा दावा केला गेला होता. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे बाकी आहे.
दरम्यान, हरी बाबूच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि संतोषच्या कबुलीजबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.
