लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असणारे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम यांचा जामीन अर्ज गांधीनगर न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला़  सूरतमधील दोन बहिणींनी आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली आह़े
आसाराम यांच्याविरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत आणि हा खटला आता महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असे मत सत्र न्या़  डी़  टी़  सोनी यांनी जामीन अर्ज फेटाळताना नोंदविल़े  आसाराम आणखी एका लैंगिक शोषणाच्या प्रकरणात जोधपूर येथे ऑगस्टपासून कोठडीत होत़े  जोधपूर न्यायालयाकडून हस्तांतरित कोठडी घेऊन ७२ वर्षीय आसाराम यांना याच महिन्याच्या सुरुवातीला येथे आणण्यात आल़े  त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी येथील शहर पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथक स्थापन केले आह़े  या पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात येत आह़े  गेल्या आठवडय़ात त्यांना पुन्हा जोधपूर येथे नेण्यात आले होत़े
या प्रकरणातील पीडित बहिणींपैकी लहान बहिणीने साई याच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली आह़े  त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार असून सूरत पोलीस देशभरात त्याचा शोध घेत आहेत़
दरम्यान, या प्रकरणात सहआरोपी असणाऱ्या आश्रमातील सुरक्षा रक्षक जसवंतिका चौधरी यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आह़े  या घटनेत त्यांचा सहभाग कमी असल्याने त्यांना जामीन देण्यात आला आह़े