scorecardresearch

China Covid Explosion: “भारतात चीनप्रमाणे करोना रुग्णसंख्येचा विस्फोट होणार नाही, कारण…”; तज्ज्ञांनी सांगितली ‘ती’ दोन कारणं

चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ

China Covid Explosion: “भारतात चीनप्रमाणे करोना रुग्णसंख्येचा विस्फोट होणार नाही, कारण…”; तज्ज्ञांनी सांगितली ‘ती’ दोन कारणं
अनेक देशांमध्ये करोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेचं वातावरण (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम, सौजन्य – रॉयटर्स)

चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग जोर धरु लागला आहे. सोमवारी दोन करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, अनधिकृत वृत्तानुसार चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. करोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाल्याचे अनधिकृतरित्या सांगण्यात येत आहे. सोमवारी झालेले दोन्ही मृत्यू बीजिंगमध्ये झाले आहेत. चीनमध्ये अवलंबण्यात येत असलेले ‘शून्य कोविड’ धोरण (झिरो कोविड) शिथील केल्यानंतर पहिल्या आठवड्यात या दोन मृत्यूंची नोंद झाली. हे धोरण शिथील झाल्यानंतर करोनाच्या प्रादुर्भावात वाढ अपेक्षित होतीच. मात्र, मृत रुग्णांचे नातलग व अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यास दुजोरा दिला. चीनमधील परिस्थितीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतानाच चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. त्यामुळेच भारतामध्येही पुन्हा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेप्रमाणे करोनासंदर्भातील आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

भारत आणि चीनच्या परिस्थितीत फरक

मात्र चीनमध्ये अचानक झालेल्या करोना रुग्णवाढी मागणील नेमकी दोन कारणं काय आहेत आणि भारतामध्ये आता अशाप्रकारचा करोना उद्रेक का शक्य नाही याबद्दल राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीचे प्रमुख असलेल्या डॉक्टर एन के अरोरा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. करोनासंदर्भातील नियम, धोरणं आणि लसीकरणासंदर्भातील सल्लागारांची समिती असलेल्या एनटीएजीआयच्या प्रमुखांनी भारत आणि चीनच्या परिस्थितीत नेमका काय फरक आहे याबद्दल भाष्य केलं. सध्या चीनमध्ये झाला तसा करोनाचा उद्रेक भारतात होणार नाही असं सांगताना अरोरा यांनी दोन मुख्य गोष्टींकडे लक्ष वेधलं.

नव्या व्हेरिएंटबद्दल अंदाज काय?

मागील वर्षी याच कालावधीमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला होता. यंदाही नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढेल असं वाटतं का? असा प्रश्न अरोरा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “हे एखाद्या भविष्यकाराला विचारण्यासारखं झालं. मात्र नवीन व्हेरिएंट येणार की नाही हे सांगणं थोडं कठीण आहे. व्हेरिएंट कधीही निर्माण होऊ शकतात. त्याबद्दल अंदाज व्यक्त करणं कठीण आहे,” असं सांगितलं. तसेच चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये करोनाचा प्रादुर्भाव का होत आहे यासंदर्भातील विश्लेषणही अरोरा यांनी यावेळी केलं.

चीनमध्ये संसर्ग वाढण्याची दोन प्रमुख कारणं कोणती?

“सध्या चीनमध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्यामागील कारण म्हणजे बहुसंख्य चिनी जनता ही लॉकडाऊन आणि निर्बंधांमध्ये होती. त्यामुळे त्यांच्याकडे नैसर्गिक पद्धतीने संसर्ग झाल्याची प्रकरण फारच कमी आहेत. त्यांच्याकडील लसींसंदर्भातही शंका उपस्थित करण्यात आली होती,” असं अरोरा म्हणाले. भारतीयांनी घाबरण्याची गरज नसल्याचं सांगतानाच अरोरा यांनी चीन आणि भारतामधील सध्याची परिस्थिती फारच वेगळी असल्याचं सांगितलं. चीनमधील करोना संसर्गामागील कारणं ही तेथील नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी असणे आणि लस कमी प्रभावशाली असणे ही असल्याचं सूचित करताना अरोरा यांनी भारतातील परिस्थिती या उलट असल्याचं म्हटलं.

नक्की पाहा >> जमीनीवरच व्हेंटिलेटर, CPR उपचार, रुग्णांना तपासता तपासता झोपी जाणारे डॉक्टर अन्…; चीनमधील करोनाची दाहकता दर्शवणारे Videos

भारत आणि चीनमध्ये नेमका फरक काय?

“चीनच्या तुलनेत भारतामध्ये नैसर्गिक संसर्ग आणि लसीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. यामुळेच आपण ओमिक्रॉनपासून सुरक्षित राहिलो आहोत,” असं अरोरा म्हणाले. “आपल्यापैकी अनेकांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नैसर्गिकपणे या विषाणूचा संसर्ग होऊन गेला असल्याने आपल्यातील हायब्रिट इम्युनिटी (नैसर्गिकरित्या निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती) उत्तम आहे. ओमिक्रॉनचा आपण यशस्वीपणे सामना केला आहे. आपल्याकडे त्यावेळेस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही,” अशी आठवणही अरोरा यांनी करुन दिली.

नवीन व्हेरिएंटची भिती?

नवीन व्हेरिएंटची भिती निर्माण झाली आहे का? आपल्याला काही चिंता करण्याची गरज आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अरोरा यांच्याशी चर्चा करताना विचारला. त्यावर अरोरा यांनी, “आपण चिंता करण्याची गरज नाही. गोष्टी अगदी सुस्थितीत आहेत. आपल्या देशातील लोकांना लसीकरणाच्या माध्यमातून सुरक्षित करण्यात आलेलं आहे,” असं उत्तर दिलं.

भारतीयांना संसर्गाचा त्रास नाही

“मार्च-एप्रिलमध्ये आपल्याकडे रुग्णसंख्या वाढली होती. मात्र आता आपल्याकडे रुग्णसंख्या २०२० नंतर सर्वात कमी स्तरावर आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जिनोम सिक्वेन्सिंगचा आहे. २०२२ च्या शेवटापर्यंत याकडेच लक्ष देण्यात आलं आहे. जगभरामध्ये ज्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत ते आपल्याकडेही आढळून आले आहेत. मात्र भारतीयांना या संसर्गाचा फार त्रास झाला किंवा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं दिसून आलं नाही,” असं निरिक्षण अरोरा यांनी नोंदवलं.

नक्की वाचा >> Bharat Jodo Yatra: “…नाहीतर ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करा”; ‘राष्ट्रहिता’चा उल्लेख करत मोदी सरकारचं राहुल गांधींना पत्र

मोठा गोंधळ निर्माण झाला नाही

केंद्राने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आता जिनोम सिक्वेन्सिंगची पद्धत बदलली जाणार आहे का? असा प्रश्न अरोरा यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “नाही असं काही नाही. मी या जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात निर्णय घेणाऱ्या गटाच्या संपर्कात आहे. नव्या व्हेरिएंटमुळे मागील वर्षाप्रमाणे मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलेलं नाही. मात्र आता आपली जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भातील यंत्रणा फारच सतर्क, सक्रीय असणं गरजेचं आहे,” असं सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 16:48 IST

संबंधित बातम्या