भारत-पाकिस्तानात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर होऊ घातलेली पहिलीवहिली चर्चा पाकिस्तानने शनिवारी रात्री तडकाफडकी रद्द केली. या चर्चेत काश्मीरचा मुद्दा असावा आणि हुरियत नेत्यांची भेटही घेता यावी, हा पाकिस्तानचा हेका भारताने धुडकावला होता. एवढेच नव्हे तर त्याबाबत शनिवार मध्यरात्रीपर्यंत पाकिस्तानने स्पष्ट हमी दिली नाही तर ही बैठक होणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानने ही घोषणा केली.
ही चर्चा विनाअटच असली पाहिजे, असा आमचा आग्रह होता. भारताने त्यात अटी लादल्याने आम्ही ही चर्चा रद्द करीत आहोत, असे पाकिस्तान परराष्ट्र विभागाने जाहीर केले. चर्चा रद्द करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाबद्दल भारताने खेद व्यक्त केला आहे. चर्चेआधी अटी लादल्या नव्हत्या, केवळ आधी ठरलेल्या चौकटीत चर्चा व्हावी, अशी आमची भूमिका होती, असे परराष्ट्र प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यातील या चर्चेत काश्मीर मुद्दय़ाचा अडसर निर्माण झाला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी, काश्मीरवर चर्चा होणार नाही आणि हुरियत नेत्यांची भेट घेणार नाही, या दोन मुद्दय़ांबाबत नि:संदिग्ध हमी देण्यासाठी पाकिस्तानकडे फक्त शनिवार मध्यरात्रीपर्यंतचा वेळ आहे, असा निर्वाणीचा इशारा पत्रकार परिषदेत दिला. तसेच अझीझ यांना भेटण्यासाठी दिल्लीत थडकलेले हुरियतचे नेते शाबीर अहमद शाह, बिलाल लोन याच्यासह तिघांना स्थानबद्ध करण्यात आले. या स्थानबद्धतेबद्दल पाकिस्तानने आगपाखड करीत रात्री उशीरा चर्चाच रद्द करण्याची घोषणा केली.
दाऊदची पाकिस्तानात ९ घरे
कुख्यात दाऊद इब्राहिम याची पाकिस्तानात नऊ घरे असून तो सातत्याने त्याचे राहण्याचे ठिकाण बदलतो, याबाबतचे पुरावे सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीत भारत देणार होता. या घरांचा तपशील उघड झाला आहे. यातील कराचीतील एक घर दाऊदने दोन वर्षांपूर्वीच घेतले असून ते पाकिस्तानी नेते बिलावल भुत्तो झरदारी यांच्या निवासस्थानाजवळ असल्याचे भारताने उघड केले आहे. दाऊदकडील तीन पारपत्रांचा तसेच त्याची पत्नी, मुले व भावांच्या पारपत्रांचा तपशीलही भारताने जाहीर केला आहे.
पाकिस्तानशी क्रिकेट नाहीच
दाऊद पाकिस्तानात असताना आणि भारतातील दहशतवादी कारवायांना सीमेपलीकडून पाठबळ मिळत असताना पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे शक्य नाही, अशी ट्विपण्णी बीसीसीआयचे सरचिटणीस अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केली. उभय देशांत संयुक्त अरब अमिरातीत डिसेंबरमध्ये क्रिकेट सामना नियोजित असून तो आता होणार नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

काश्मीरचा प्रश्न टाळून भारताशी बोलणी होऊच शकत नाहीत.
सरताज अझीझ

पाकिस्तानातील काही शक्ती संवादाचा मार्ग रोखण्यासाठी कार्यरत आहेत.
सुषमा स्वराज</p>

दिवसभरात..

’१२.५५ : काश्मीरमधील फुटीरतावादी नेते शाबीर शाह यांच्यासह तीन नेत्यांना दिल्ली विमानतळावर अटकाव. पोलिसांनी ताब्यात घेतले.
’१.२५ : केवळ दहशतवादाच्या मुद्दय़ावरच आम्हाला एनएसए पातळीवरील चर्चा करायची आहे. आता निर्णय पाकिस्तानने घ्यावा. – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य.
’१.३० : काही ठोस निष्पन्न होणार नसेल तर पाकिस्तानशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नसल्याचे काँग्रेसचे प्रतिपादन.
’१.४२ : पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांची इस्लामाबादेत पत्रकार परिषद सुरू.
’१.५३ : कोणत्याही पूर्वअटींशिवाय आपण भारतात जाऊन अजित डोवल यांना भेटण्यास अजूनही तयार आहोत. – सरताज अझीझ यांचे वक्तव्य.
’४.०० : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची पत्रकार परिषद.
’४.४० : भारताकडून कोणत्याही पूर्वअटी घालण्यात आलेल्या नाहीत. फक्त आता काश्मीरवर चर्चा होणार नाही याचेच स्मरण आम्ही करून देत आहोत. चर्चा होईल ती केवळ दहशतीवर. – स्वराज.
’४.५८ : पाकिस्तान भारताच्या भूमिकेशी सहमत नसेल, तर चर्चा होणार नाही. – स्वराज.
’९.३० : पाकिस्तानकडून चर्चा रद्द करण्यात आल्याचे जाहीर.