माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात पुरावे नसल्याने कोळसा खाण घोटाळा प्रकरणात त्यांचे नाव आरोपी यादीत समाविष्ट करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) सोमवारी विशेष न्यायालयासमोर दिले. जिंदाल समूहाला करण्यात आलेल्या कोळसा खाण वाटपाच्या वादात तत्कालीन कोळसा मंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा साधा प्रथमदर्शनी सहभाग देखील दिसून आलेले नाही. या घोटाळ्यासंबधीचे कोणतेही पुरावे मनमोहन सिंग यांचा खाण वाटप गैरव्यवहारात समावेश असल्याचे सिद्ध करणार नाहीत. त्यामुळे सिंग यांचे आरोपींच्या यादीत नाव समाविष्ट करणे योग्य ठरणार नाही, असे सरकारी वकील आर.एस.चीमा न्यायालयासमोर म्हणाले. तसेच सिंग यांचा आरोपींच्या यादीत समावेश करावा अशी याचिका करणारे झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा हे स्वत: या प्रकरणातील आरोपी आहेत. त्यामुळे अशाप्रकारची याचिका दाखल करून मधु कोडा यांच्यामुळे या खटल्याच्या निकालाला केवळ विलंब होत नसून त्यांच्याकडून न्यायालयाची दिशाभूल करण्याचेही प्रयत्न होत असल्याचे चीमा यावेळी म्हणाले.
मनमोहन सिंग यांच्यासह उर्जा खात्याचे तत्कालीन सचिव आनंद स्वरूप आणि तत्कालीन खाण आणि भुगर्भ खात्याचे सचिव जय शंकर तिवारी यांचाही आरोपींच्या यादीत समावेश करण्याची मागणी कोडा यांनी केली होती. त्यासही सीबीआयने नकार दर्शविला. आनंद स्वरूप आणि जय शंकर तिवारी हे दोघेही याप्रकरणाचे सरकारचे महत्त्वाचे साक्षीदार असून खाण वाटपाच्या गैरव्यवहारात या दोघांचाही कोणताही सहभाग असल्याचे समोर आलेले नाही, असे स्पष्ट केले. सीबीआयने स्पष्टीकरण सादर केल्यानंतर  न्यायालायने कोडा यांच्या याचिकेवरील सुनावणी १६ ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.