जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला आग्रा येथील ताजमहाल हे हिंदू मंदिर असल्याचा कोणताही पुरावा अस्तित्वात नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत दिले आहे. ताजमहाल हे हिंदू मंदिर असल्याचा दावा करत दिल्लीतील सहा वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंबंधी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर शर्मा यांनी लेखी उत्तर सादर केले. ताजमहाल ही हिंदू वास्तू असल्याचा एकही पुरावा सरकारकडे नाही. त्यामुळे ताजमहालला हिंदू वास्तू घोषित करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे शर्मा म्हणाले.

साहित्यिकांच्या ‘पुरस्कार वापसी’बद्दलच्या प्रश्नांवर देखील शर्मा यांनी उत्तरं दिली. ते म्हणाले की, देशात लेखकांविरोधात घडलेल्या काही घटनांच्या निषेधार्थ साहित्यिकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार परत केले आहेत. साहित्य अकादमीने विशेष बैठक घेऊन लेखक आणि साहित्यिकांवरील हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला. तसेच साहित्यिकांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचेही आवाहन अकादमीकडून करण्यात आले, असेही शर्मा म्हणाले. शर्मा यांनी आपल्या स्पष्टीकरणासह साहित्य अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या ३९ साहित्यिकांची यादीही लोकसभेत यावेळी सुपूर्द केली.