केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीतील रोहिग्यांना बक्करवाला येथील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी असलेल्या ईडब्लूएस(EWS) प्लॅटमध्ये स्थलांतरित करणार असल्याचे ट्वीट केले होते. यानंतर काही तासातच केंद्रीय गृहमंत्रालयाने अशाप्रकारचा कुठलाही आदेश दिला नसल्याचे ट्वीट करत स्पष्ट केले आहे.

“दिल्ली सरकारने रोहिग्यांना नवीन ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. गृहमंत्रालयाने GNCTD ला आदेश देत रोहिंग्या आहे त्याच ठिकाणी राहतील हे सुनिश्चित करायला सांगितले आहे. या निर्वासितांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी संबंधित देशांची चर्चा सुरू आहे” असे ट्वीट गृहमंत्रालयाने केले आहे.

दरम्यान, “भारताने शरणार्थींचे नेहमीच स्वागत केले आहे. रोहिंग्यांना एका ऐतिहासिक निर्णयानुसार नवी दिल्लीतील ईडब्लूएस(EWS) प्लॅटमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. याठिकाणी त्यांना मुलभुत सुविधांसह दिल्ली पोलिसांची सुरक्षा दिली जाईल”, असे ट्वीट हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी सकाळी केले होते. या त्यांच्या ट्वीटवर काही तासातच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

दिल्लीतील मदनपूर खादार आणि कालिंदी कुंज या भागात रोहिंग्या दशकभरापासून राहत आहेत. या निर्वासितांच्या वस्तीमध्ये २०१८ आणि २०२१ मध्ये आग लागली होती. तेव्हापासून हे लोक दिल्ली सरकारने दिलेल्या तंबूत राहत आहेत. या ठिकाणाला डिटेंशन सेंटर म्हणून घोषित करावे, असे निर्देश गृह मंत्रालयाकडून दिल्ली सरकारला देण्यात आले आहे.