लहान शेतकरयांना मोफत वीज,बिनव्याजी कर्जासह अनेक प्रकारच्या सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जात असल्याने महाराष्ट्राप्रमाणे शेतकरयांच्या आत्महत्यांचे प्रकार छत्तीसगढमध्ये होत नाहीत,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ.रमणसिंह यांनी लोकसत्ताशी बोलताना केले. अनेककलमी उपाययोजनांमुळे नक्षलवादाचा कणा मोडला असून राज्याची विकास वेगाने होत असल्याने पुढील पाच वर्षांच्या आतच छत्तीसगढ हे देशातील पहिल्या तीन क्रमांकांच्या राज्यांमध्ये गणले जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्तीसगढमध्ये नया रायपूर, दांतेवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काही प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने राज्याच्या वाटचालीची व होत असलेल्या प्रगतीची माहिती डॉ.रमणसिंह यांनी दिली. कृषी क्षेत्राविषयी विचारलेल्या प्रवाशांवर बोलताना ते म्हणाले, शेतकरयांच्या आत्महत्येचे कारण कर्ज आणि त्याची आíथक परिस्थिती असते.आम्ही शेतकरयाला बिनव्याजी कर्ज,लहान शेतक्रयांना मोफत वीज, केवळ धान्यालाच किमान हमीभाव नाही,तर चिंचेसारखीउत्पादनेही खरेदी करतो. सुमारे ६० लाख गरिबांना एक रूपया किलो दराने धान्य देतो. सिंचन वाढत असून शेतीलाही २४ तास वीज देतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न येथे नाही.

अन्नप्रक्रियेचे दोन मोठे प्रकल्प उभारले  आहेत. नक्षलवादामुळे विकासाच्या वेगाला काही प्रमाणात फटका बसला. पण दांतेवाडा, बस्तर  येथे रस्ते, रेल्वेमार्ग उभारणी केंद्र व राज्य सरकार करीत आहे. शिक्षण, नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्यांचे पुनर्वसन, रोजगार पुरविणे, आदींमुळे नक्षलवादाला जनतेचा पािठबा नाही. विकास आणि शांतता त्यांना हवी आहे.

छत्तीसगढ म्हणजे नक्षलवाद हा समज खोटा असून तो पुसून टाकून गुंतवणूकदारांना आकर्षति करण्यासाठी पावले टाकली आहेत. यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये जाऊन गुंतवणूकदारांना आवाहन करणार आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्या याव्यात,यासाठी नॅसकॉमसह काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. सिमेंट, स्टील, वीज, खाण क्षेत्रात विस्तार कार्यक्रम सुरू असून अन्य राज्ये याबाबतीत आमच्याशी स्पर्धाही करु शकणार नाहीत. नया रायपूर सारखे स्मार्टसिटी विकसित केले जात असून एज्युकेशन हब तयार करण्यात येत आहे. ट्रिपल आयटी, आयआयएमसहअनेक संस्था आणि नामांकित खासगी संस्था सुरू करण्यात येत असल्याने राज्याची सर्वागीण प्रगती होत असल्याचे डॉ.रमणसिंह यांनी स्पष्ट केले.