नामिबियातून भारतात आठ चित्ते आणण्यात आले आहेत. मध्यप्रदेशमधील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांना ठेवण्यात आलं आहे. यातील एक मादी चित्ता गर्भवती असल्याचं वृत्त समोर आलं होते. यावरती आता उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, कोणत्याही चित्त्याचं नामकरण केलं नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कुनो-पालपूर उद्यानाचे अधिकारी प्रकाश कुमार वर्मा म्हणाले, “उद्यानात आणणेल्या कोणत्याही चित्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामकरण केलं नाही. जर, त्यांनी चित्त्यांना नावे दिली असती, तर ‘मन की बात’मध्ये जनतेला नाव सुचवण्यास का सांगितलं असते.”

हेही वाचा – इंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर चाहत्यांचा ‘राडा’; हिंसाचारात १७४ जणांचा मृत्यू

“तसेच, यातील कोणतीही मादी चित्ता ही गर्भवती नाही आहे. त्याप्रकारची कोणताही चाचणी करण्यात आली नाही. अथवा नामिबियातून तसा अहवाल प्राप्त झाला नाही आहे. हे वृत्त कसे पसरले याबाबत माहिती नाही,” असेही प्रकाश कुमार वर्मा यांनी स्पष्ट केलं.

चित्त्यांची देखभाल करणाऱ्या सीसीएच्या डॉ. लॉरी मार्कर म्हणाल्या, “मादी चित्ता गर्भवती असण्याची शक्यता आहे. आम्हाला याची लवकरच माहिती मिळेल. मादी गर्भवती असेल तर ही नामिबियाची आणखी एक भेट असेल. त्यामुळे मादी चित्त्याला एकांतवास आणि शांतता दिली पाहिजे,” असेही मार्कर यांनी सांगितलं.