मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाणाची काहीच माहिती नसल्याचे सांगत केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत घुमजाव केले. दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे याबाबत काहीच कल्पना नसून त्याच्या ठावठिकाणाची माहिती मिळताच त्याला अटक करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले जातील, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत दिली. दाऊद इब्राहीमच्या शरण येण्याचा मुद्दा लोकसभेत गाजला. खासदार नित्यानंद राय यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरिभाई चौधरी यांनी दाऊदच्या ठावठिकाणाची माहिती नसल्याचे विधान केले.
दाऊदला आमच्या ताब्यात द्या
दरम्यान, सत्तेत येण्याआधी भाजप सरकारने दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे तर, सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत दाऊद जेरबंद असेल असे वक्तव्य देखील भाजप नेत्यांनी केले होते. तर, २७ डिसेंबर २०१४ रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनीही दाऊद पाकिस्तानातच असल्याचा दावा केला होता. तसेच भारत सरकारने त्यांच्या कराचीतील वास्तव्याचे सर्व पुरावे पाकिस्तानला दिले आहेत, असे सांगण्यात आले होते.
दाऊदचा शरणागती प्रस्ताव सीबीआयने फेटाळल्याचा गौप्यस्फोट आणि नकारही!
यापूर्वी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाऊद पाकिस्तानात असल्याच म्हटले होते. तर पाकिस्तान जर खरंच दहशवादाविरोधात खंबीरपणे लढण्याबाबत गंभीरतेने विचार करत असेल, तर पाकिस्तानने हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम यांना भारताच्या स्वाधीन करावे अशी मागणी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली होती. मात्र, मंगळवारी केंद्र सरकारने दाऊदचा ठावठिकाणा माहित नसल्याचे सांगत कोलांटीउडी मारली आहे.