पाकिस्तान लष्कराचे समर्थन असलेले जवळपास ४० दहशतवादी केरन क्षेत्रात घुसलेले असून, भारतीय जवान त्यांच्याशी लढत असल्याने या क्षेत्रात कारगिलसदृश स्थिती निर्माण झाली असल्याचा केला जात असलेला दावा लष्करप्रमुख जन. विक्रम सिंग यांनी सपशेल फेटाळून लावला. लवकरच या दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला जाईल, असा विश्वासही लष्करप्रमुखांनी व्यक्त केला. दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणत्याही भारतीय गावावर दहशतवाद्यांनी कब्जा केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केरन येथे कारगिलसदृश स्थिती निर्माण झालेली नाही, तर ३० ते ४० दहशतवाद्यांनी केलेला हा घुसखोरीचा प्रयत्न आहे, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. केरन येथे कारगिलसदृश स्थिती निर्माण झाली आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
या दहशतवाद्यांना थोपविण्यात आले असून काही जणांना कंठस्नान घालण्यात आले आहे, त्यांच्याविरुद्ध मोहीम जारी असून त्यांना हुसकावून लावणे हा आता काही तासांचा प्रश्न उरलेला आहे, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान लष्कर पुरस्कृत दहशतवाद्यांनी कोणत्याही भारतीय गावावर कब्जा केलेला नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इतकेच नव्हे तर कोणत्याही भारतीय ठाण्याचा अथवा बंकरचा दहशतवाद्यांनी ताबा घेतलेला नाही, असेही ते म्हणाले.
दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याबरोबरच आम्हाला आमच्या जवानांच्या जिवाचे रक्षणही करावयाचे आहे, त्यामुळे कारवाईला अद्याप काही कालावधी लागेल. नजीकच पाकिस्तानचे ठाणे असल्याने ते आपल्या ठाण्यांवर हल्ला करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई करताना सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.