गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत काहीही परस्पर संबंध नाही, असे सरकारने आज राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणात काहीही परस्पर संबंध नाही. उजव्या आघाडीच्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पानसरे यांच्या हत्या प्रकरणी अलीकडे सनातन संस्थेचे नाव चर्चेत होते कारण त्यांच्या एका सदस्याला अटकही झाली होती. सनातन संस्थेने तो आपला सदस्य असल्याचे मान्य करून त्याचा हत्येत हात नसल्याचे स्पष्ट केले होते. रिजिजू यांनी सांगितले की, ज्या संघटनांचा परिणाम शांतता व सलोख्यावर होत आहे त्यांच्यावर लक्ष ठेवले जात असून कायदा अंमलबजावणी संस्था त्यांच्यावर कारवाई करीत आहेत. पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्यावर हल्ला झाला होता व त्यानंतर पाच दिवसांनी जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. कन्नड लेखक कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट रोजी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्य़ात हत्या झाली होती.