केरळमधील सीपीआय(एम) पक्षाच्या नेत्याने वेगवळ्या विचारसणीच्या सामाजातील व्यक्तींसोबत केलेल्या विवाहबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. आपल्याच पक्षातील एका कार्यकर्त्याने केलेल्या लग्नाबद्दल भाष्य करताना नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता पक्षाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.

“लव्ह जिहाद असा काही प्रकार नसतो. हा संघ परिवाराच्या अजेंड्याचा एका भाग आहे ज्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. जॉर्ज एम. थॉमस यांनी नकळत ते वक्तव्य केलं. त्यांना आपली चूक समजली आहे,” असं सीपीआय (एम) चे कोझिकोडे जिल्हाचे सचिव पी मोहनलाल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलंय.

मंगळवारी कोझिकोडे जिल्ह्यातील पक्ष समितीचे सदस्य आणि दोन वेळा आमदार राहिलेल्या थॉमस यांनी डोमॅस्टीक युथ फेड्रोशन ऑफ इंडियाचे (डीव्हायएफआय) नेते एमएस शीजीन यांनी ज्योत्सना या मुलीसोबत विवाह केल्याने कोडेंचेरी जिल्ह्यामधील सामाजिक स्थिरतेला बाधा पोहचलीय, असं वक्तव्य केलेलं. शीजीन हे मुस्लीम असून ज्योत्सना ही ख्रिश्चन धर्मीय आहे. मात्र या वक्तव्यानंतर पक्षाच्या युवा संघटनेनं पत्रक जारी करत वेगळ्या विचारसणीच्या समाजामधील व्यक्तींबरोबरच आणि अंतरधर्मीय विवाहांना पक्षाचा विरोध नसल्याचं म्हटलं होतं.

ज्योत्सनाचे लग्न शीजीनसोबत ९ मार्च रोजी झालं. त्यानंतर स्थानिकांमधील ख्रिश्चन धर्मियांपैकी काही लोकांनी आंदोलनं केली. यामुळेच हे दोघेही भूमिगत झाल्यासारखे लपून होते. स्थानिकांनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवून ज्योत्सनाचा शोध घेण्याची मागणी घेतली. मुलीच्या पालकांनाही वेगली तक्रार दाखल केली.

दरम्यान या नवदांपत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये ज्योत्सनाने हे लग्न आपण आपल्या इच्छेनुसार केलं आहे, असं स्पष्ट केलं. दोघांनी लग्नाचे फोटोही जारी केले. मंगळवारी हे दोघे लग्नाची नोंदणी करण्यासाठी न्यायालयामध्ये आले होते. ज्योत्सनाने आपल्याला शीजीनसोबतच रहायचं असल्याचं म्हटलंय. थॉमस यांनी या लग्नासंदर्भात बोलताना, “या मुलीच्या पालकांसोबत पक्षाच्या संवेदना कायम आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये शीजीनने चुकीची भूमिका घेतली. पक्ष यासंदर्भात विचार करुन कारवाई करावी की नाही याबद्दल निर्णय घेईल,” असं म्हटलं.

मात्र डीव्हायएफआयने थॉमस यांच्या वक्तव्याच्याविरोधात भूमिका घेत एक पत्रक जारी केलं. “डीव्हायएफआयच्या नेत्याच्या लग्नावरुन सुरु असणारा वाद दुर्देवी आणि गरज नसताना निर्माण केला आहे. हे लग्न ही या दोघांचा खासगी निर्णय आहे शीजीन आणि ज्योत्सना हे दोघेही पुढारलेल्या विचारसणीची उदाहरणं आहेत. आमच्या संस्थेचा या दोघांनाही पाठिंबा आहे,” असं या पत्रकात म्हटलं होतं.

सीपीआय (एम)ने कायमच अंतरधर्मीय विवाहांना पाठिंबा दिल्याचं वक्तव्य थॉमस यांनी बुधवारी केलं. “पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलीय. डीव्हायएफआयच्या नेत्याने या लग्नाबद्दल आधीच कळवलं असतं तर पक्षाने आधीच पाठिंबा दिला असता. अशाप्रकारे त्यांनी पळून जायला नको होतं. यामुळे या प्रदेशातील ख्रिश्चिन धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या,” असं थॉमस म्हणाले.