“कोणत्याही माफियाला बसपा तिकीट देणार नाही”; मायावती यांचा मुख्तार अन्सारी यांना ‘दे धक्का’

मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीनं यावेळी माफियांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार मुख्तार अन्सारी यांना तिकीट मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maya-Ansari
मायावती यांचा मुख्तार अन्सारी यांना 'दे धक्का' (Photo- Indian Express)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीनं यावेळी माफियांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार मुख्तार अन्सारी यांना तिकीट मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या जागेवर यावेळी बसपाचे प्रदेशाध्यक्ष भीम राजभर हे मऊ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. बसपा अध्यक्ष मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मायावती यांच्या या निर्णयाकडे पक्षाची प्रतिमा नागरिकांमध्ये उंचवण्यासाठी घेतलेलं पाऊल असल्याचं बोललं जात आहे.

“आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही माफियाला पक्षाचं तिकीट मिळणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील आझमगड विधानसभा मतदारसंघातून मुख्तार अन्सारी ऐवजी बसपा प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना तिकीट देण्याचं निश्चित केलं आहे”, असं ट्वीट बसपा अध्यक्ष मायावती यांनी केलं आहे.

मायावती यांनी पक्ष प्रभारींना उमेदवारांची निवड करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सरकार स्थापन केल्यानंतर अशा घटकांवर कठोर कारवाई करताना कोणतीच अडचण नको, म्हणून त्यांनी पक्षातील नेत्यांना ताकीद दिली आहे. दुसरीकडे, बांदा तुरुंगात बंद असलेले आमदार मुख्तार अन्सारी यांच्या मोठ्या भावाने समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. तेव्हापासून मायावती नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्तार अन्सारी मागील विधानसभा निवडणूक बसपाच्या तिकीटावर जिंकले होते. तर त्यांचा भाऊ अफजाल अन्सारी २०१९ मध्ये गाजीपूरमधून बसपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No mafia will get party ticket says bsp cheif mayawati rmt