PM Narendra Modi-Biden call: युक्रेनच्या दौऱ्याहून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोनद्वारे या दौऱ्याची माहिती दिली. तसेच त्यांनी बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असल्याबाबतचा विषय काढला. मात्र अमेरिकेकडून काढल्या गेलेल्या प्रसिद्धी पत्रकात या विषयाचा उल्लेखच केलेला नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या फोनद्वारे झालेल्या संभाषणात बांगलादेशमधील हिंदूंचा विषय निघाला की नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पो्स्ट करत बायडेन यांच्याबरोबर झालेल्या संभाषणाची माहिती दिली. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे उभय नेत्यांमधील संभाषणाची माहिती दिली. बांगलादेशमधील परिस्थितीबाबत मोदींनी चिंता व्यक्त केली असून तेथील हिंदू अल्पसंख्यांकाची सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबत भाष्य केले. तर अमेरिकेच्या प्रसिद्धी पत्रकात केवळ युक्रेन-रशिया युद्धाचा उल्लेख करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले, “त्यांनी (पतंप्रधान मोदी आणि जो बायडेन) बांगलादेशमधील कायदा व सुव्यवस्था पुन्हा रूळावर आणणे आणि अल्पसंख्यांकाची विशेष करून हिंदूंचे संरक्षण करण्याबाबत चर्चा केली”
दरम्यान आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डेरेक जे. ग्रॉसमन यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर दोन्ही देशांच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकाला जोडून त्यातील विसंगती दाखवून दिली. व्हाईट हाऊसने काढलेल्या पत्रकात बांगलादेशाचा उल्लेखच आढळत नाही. पंतप्रधान मोदींनी पोलंड आणि युक्रेनचा दौरा केला असून त्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
पोलंड आणि युक्रेनचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत, याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केले. युक्रेनला मानवतावादी मदत देणे आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचीही बायडेन यांनी स्तुती केली.
बांगलादेशमधील अस्थिरतेबाबत अमेरिकेचे मौन
बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेबाबत अमेरिका अनेक दिवसांपासून मौन बाळगून आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विषयावरून सुरू झालेला संघर्ष संत्तातरापर्यंत पोहोचला. आठवडाभर चाललेल्या संघर्षात जवळपास ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे सरकार पडले. बांगलादेशच्या घडामोडींवर अमेरिकाचा प्रभाव होता, असा एक आरोप होत असताना व्हाईट हाऊसने हा आरोप फेटाळून लावला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अमेरिकेबरोबरचे संबंध अलीकडच्या काळात सौहार्दपूर्ण नव्हते, असेही सांगितले जाते.