एकट्याने विमान प्रवास करणाऱ्या महिलांसाठी विस्तारा एअरलाईन्सने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.  महिला प्रवाशांना यापुढे विमानात मिडल सीट न देता विंडो किंवा कॉर्नर सीटच दिली जाईल असे ‘विस्तारा’ने जाहीर केले आहे. याशिवाय महिला प्रवाशांना टॅक्सी बूक करुन देण्यासाठीही मदत करणार असल्याचे ‘विस्तारा’ने म्हटले आहे.

‘विस्तारा एअरलाईन्स’मधून दररोज सरासरी ७० ते १०० महिला प्रवासी एकट्याने प्रवास करतात. अशा महिलांसाठी विस्तारा एअरलाईन्सने मार्च महिन्यात ‘विस्तारा वुमन फ्लायर’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत सुमारे ८ हजार महिलांनी नोंदणी केली. या योजनेअंतर्गत महिला प्रवाशांना विमान प्रवासादरम्यान मिडल सीट मिळणार नाही. त्यांना विंडो किंवा कॉर्नर सीटच दिली जाईल. तिकीट बुक करताना किंवा वेब चेक इन करताना महिला प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध असेल.

विमान प्रवासादरम्यान महिलांना तीन आसनांमधील मिडल सीट म्हणजेच मधली जागा मिळाल्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  ‘विस्तारा’ने सर्वेक्षण केले. यातील बहुसंख्य महिलांनी विंडो किंवा कॉर्नर सीट मिळावी, असे मत मांडले होते. याची दखल घेत ‘विस्तारा’ने हा निर्णय घेतला आहे.

एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसमोर आणखी एक अडचण असते ती सामानाची. सामान जास्त असल्यास महिला प्रवाशांची तारांबळ उडते. यावर विस्ताराने तोडगा काढला आहे. ‘विस्तारा वुमन फ्लायर’ या योजनेअंतर्गत महिला प्रवाशांना यातही मदत केली जाईल असे एअरलाईन्सने म्हटले आहे. याशिवाय विमानतळातून बाहेर पडल्यावर टॅक्सी बुक करण्यासाठी एअरलाईन्सचे कर्मचारी मदत करतील. महिला प्रवाशांना विमानतळाबाहेर सोडण्यासाठी एक कर्मचारी सोबत येईल. मात्र या दोन्ही सुविधा पर्यायी असतील. विस्तारा वुमन फ्लायर प्लेकार्ड असलेल्या महिलांसाठीच ही सुविधा असेल.