अनेकांची परदेशात जाण्याची इच्छा असते; मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट काढण्याचा अनेकांना कंटाळा येतो. पासपोर्ट काढण्यासाठी असलेली प्रक्रिया आणि त्याला लागणारा वेळ यांमुळे अनेक जण पासपोर्ट काढण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आता परराष्ट्र मंत्रालय प्रादेशिक पारपत्र कार्यालयानं यावर तोडगा काढला आहे. २ जुलै २०२६ पासून, ज्या अर्जदारांचे पारपत्र किंवा पीसीसी (PCC) अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत, त्यांना विदेश भवन, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१ येथील आरपीओ (RPO) मुंबई कार्यालयात बुधवार वगळता इतर सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत ‘वॉक-इन’ प्रवेश (पूर्व किंवा ऑनलाइन भेटीची वेळ न घेता) दिला जाईल.

खालील श्रेणींमधील अर्जदारांसाठी, अर्जाच्या तारखेचा विचार न करता, ‘वॉक-इन’ (पूर्व-नियोजनाशिवाय थेट उपस्थित राहून) प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे

  • राजनैतिक (Diplomatic) आणि अधिकृत (Official) पासपोर्ट
  • वितरित न होता परत आलेला पासपोर्ट / PCC पुन्हा पाठवण्याची विनंती
  • परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय पासपोर्ट परत करणे (Surrender)
  • प्रलंबित पासपोर्ट अर्ज बंद करण्याची विनंती.

ज्या अर्जदारांनी आधीच नंतरच्या तारखेसाठी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतली आहे आणि ज्यांचे अर्ज ४५ दिवसांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत, तेदेखील ‘वॉक-इन’ प्रवेश सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

पासपोर्ट खराब झाल्यास किंवा हरवल्यास काय करावे?

१) जर तुमचे पासपोर्ट परदेशात हरवले असेल, तर तुम्ही ताबडतोब जवळचे पोलीस ठाणे आणि पासपोर्ट कार्यालय किंवा तेथील भारतीय दूतावासाकडे तक्रार करावी. त्याशिवाय तुम्ही पासपोर्ट ‘पुन्हा जारी’ (‘री-इश्यू’) करण्यासाठीही अर्ज करू शकता.

२) पासपोर्ट ‘पुन्हा जारी’ (रि-इश्यू) करण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असायला हवीत, जी तुम्हाला अर्जासोबत सादर करावी लागतील.

पासपोर्ट पुन्हा बनविण्यासाठी अर्ज कसा करावा?

जर तुमचे पासपोर्ट हरवले किंवा खराब झाले, तर तुम्हाला पासपोर्ट कार्यालय पासपोर्टची दुसरी प्रत (ड्युप्लिकेट पासपोर्ट) देत नाही. तुम्हाला नवीन क्रमांकासह पासपोर्ट दिले जाते, ज्याची वैधताही त्यात नव्याने नमूद केलेली असेल. अधिक माहितीसाठी अर्जदार पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी हरवलेले/खराब झालेले पासपोर्ट सोबत जोडून, घालून दिलेल्या नियमांचा संदर्भ देऊ शकतात.

नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करावे?

१) प्रथम जुन्या पासपोर्ट ची एक कॉपी घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा.

२) जर तुम्हाला पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदवायचा नसेल, तर तुम्ही जवळच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयात (RPO) अपॉईंटमेंट बुक करा.

३) यावेळी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यात स्थानिक रहिवासी पुरावा, आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र यांसारख्या आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.

४) अर्जदार अधिकृत पारपत्र सेवा संकेतस्थळाद्वारे अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाइनदेखील नोंदणी करू शकतात.

५) त्यासाठी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड आयडीने लॉग इन करा किंवा लवकर अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही ‘तत्काळ’ ऑप्शनदेखील निवडू शकता.

६) आता तुमच्या सोईनुसार पेमेंट आणि अपॉईंटमेंटची तारीख निवडा.

७) महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट हरवल्यानंतर ते पुन्हा मिळविण्यासाठी तुमच्याकडून प्रोसेसिंग फी घेतली जाते.

८) नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी, पासपोर्ट जारी करण्याच्या नियमित प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.