लुईस बर्जर कंपनीने दिलेल्या लाच प्रकरणी माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली असून गोवा पोलिस योग्य दिशेने तपास करीत आहेत त्यामुळे सीबीआय चौकशीची गरज नाही असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण शाखा योग्य तपास करीत असून त्यात आपण हस्तक्षेप करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भ्रष्ट कारवायात नेहमीच सामील होते, असा आरोप गोवा गुन्हे अन्वेषण शाखेने न्यायालयात केला आहे. लुईस बर्गर लाच प्रकरणी कामत यांचा लाचखोरीच्या कटात सक्रिय सहभाग होता व ते लाभार्थी आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.
जिल्हा न्यायालयात दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. कामत यांनी लाच मिळेपर्यंत फाईल्स रोखून धरल्या होत्या. त्यामुळे त्यांचे कोठडीत जाबजबाब घेण्याची परवानगी दिली. कामत यांना न्यायालयाने अटकेपासून १२ ऑगस्टपर्यंत संरक्षण दिले असून गुन्हे अन्वेषण शाखेने प्रतिसादासाठी आणखी वेळ मागितला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने तरी नंतर उत्तर दिले असून कामत यांनी भारताची व गोव्याची प्रतिमा त्यांच्या कारनाम्यांनी खराब केली असे म्हटले आहे. गोव्यातील कोळसा खाणीतील गैरव्यवहारातही कामत यांचा हात आहे व लोकलेखा समितीने त्यांच्या नावावर ठपका ठेवला होता. कामत व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी २०१० मध्ये जीआयसीए प्रकल्पाच्या काही फाईल्स रोखून ठेवल्या व संबंधितांकडे लाच मागितली, असे तपासात निष्पन्न झाले आहे. नंतर जीआयसीए गोवा या संस्थेचे माजी संचालक आनंद वाचासुंदर यांनी लुईस बर्जर कंपनीला संदेश पाठवला व कामत यांना लाच देण्यात आली. पण कामत यांनी चौकशीत सहकार्य केलेले नाही असे गुन्हे अन्वेषण विभागाचे मत आहे.