पठाणकोट हल्ल्यासंदर्भात मसूद अझरला अटक झाल्याचे वृत्त जैश-ए-मोहम्मद या संघटनेने फेटाळून लावले आहे. कोणालाही अटक झालेली नाही, आम्ही अजूनही कार्यरत आहोत, असे जैश-ए-मोहम्मदतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या उर्दू भाषेतील निवेदनात म्हटले आहे. पठाणकोटमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला दिल्यानंतर पाकिस्ताकडून जैश-ए-मोहम्मद संघटनेवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. जैश-ए-मोहम्मदच्या या दाव्यामुळे पाकिस्तानने केलेल्या कारवाईबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जगभरातील आमचे विरोधक जैश-ए-मोहम्मदच्या सदस्यांना अटक झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. मात्र, अशाप्रकारची कोणतीही अटक झालेली नाही आणि झालीच तरी त्याने काय फरक पड़तो? एक व्यक्ती कमी होईल, बाकी काही होणार नाही, असे जैश-ए-मोहम्मदने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानी सरकारने जैश-ए-मोहम्मद विरोधात स्विकारलेला कारवाईचा मार्ग हा देशासाठी खूप धोकादायक असल्याचा इशारा कालच मसूद अझरकडून देण्यात आला होता. सरकारने जैश-ए-मोहम्मद विरोधात स्विकारलेला कारवाईचा मार्ग हा देशासाठी खूप धोकादायक आहे. सरकारची ही कृती मशिदी, मदरसे आणि जिहादी चळवळीच्या विरोधात असून त्यामुळे पाकिस्तानची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आल्याचे मसूद अझर याने म्हटले होते. जैश-ए-मोहम्मदच्या ‘अल-कलाम’ या ऑनलाईन मुखपत्रात मसूद अझरचा हा लेख प्रसिद्ध झाला होता.