आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आणि भाषणांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत या देशाला कोणी धक्काही लावू शकत नाही, असे म्हटले आहे. सुरतमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
त्या म्हणाल्या, या देशाच्या प्रगतीसाठी ज्यांना खरोखरच योगदान द्यायचे आहे. त्यांना सशक्त करण्याचे वातावरण आम्हाला तयार करायचे आहे. पण ज्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत. त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान आहेत, तोपर्यंत देशाला कोणी धक्काही लावू शकत नाही. कोणाचीही देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंम्मतच होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी स्मृती इराणी बुधवारी सुरतमध्ये आल्या होत्या. सुरतमध्ये भारत माता गौरव फेरी काढण्यात आली. त्यामध्ये स्मृती इराणी सहभागी झाल्या होत्या. शहरातील नवापूर भागातून ही फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये अनेक मुस्लिम नागरिकही सहभागी झाले होते.



