Noida Guard Abuse Viral Video: नोएडामधील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीत सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ, मारहाण आणि जातीवाचक अपशब्द वापरल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेने आपली भूमिका मांडली आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सदर महिलेने सांगितले की, मला या घटनेचा कोणताही पश्चाताप नसून मी कोणतीही चूक केलेली नाही. येशा कुमार (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेप्रकरणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सीने पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.
नोएडातील ‘आम्रपाली सेंच्युरियन पार्क टेरेस होम्स’ सोसायटीमध्ये २५ ऑगस्ट रोजी पहाटे ही घटना घडली. सदर घटनेचा ४ मिनिटे ५२ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये येशा कुमार सुरक्षा रक्षकांवर ओरडताना, जीवे मारण्याची धमकी देताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.
“तुझी माझ्यासमोर काहीच औकात नाही,” असे ओरडून सांगताना महिलेने रक्षकांना चपलेने मारण्याची आणि त्यांच्याकडून बूट साफ करून घेण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे, तर त्यांनी एका रक्षकाला लाथ मारण्याचाही प्रयत्न केला.
महिलेची नेमकी भूमिका काय?
व्हायरल व्हिडीओवर बोलताना येशा कुमार यांनी सांगितले की, मी २५ ऑगस्ट रोजी पहाटे अडीचच्या सुमारास ई कॉमर्स साइटवरून खाद्यपदार्थ मागवले होते. मात्र सुरक्षा रक्षकांनी डिलिव्हरी बॉयला सोसायटीच्या आत सोडण्यास नकार दिला. त्यावेळी मी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे खाली जाण्याची माझी इच्छा नव्हती. तरीही त्यांनी मला गेटवर बोलावून घेतले. मी मद्यधुंद असल्यामुळे संतापले होते, हे मान्य करते. पण मी कुणाचीही माफी मागणार नाही. मी घरात एकटी राहते, त्यामुळे मला मुद्दामहून लक्ष्य केले जात आहे.
मी एकटी राहते, हे कुणाला रुचत नाही. त्यामुळे माझ्या घराची वीज कापणे, मोलकरणीला घरी काम करण्यापासून अडवणे, असे अनेक प्रकार सोसायटीत घडत आहेत.
सुरक्षा रक्षकांनी कोणते आरोप केले?
सुरक्षा रक्षकांचे पर्यवक्षक अमित शर्मा यांनी येशा कुमार यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, डिलिव्हरी बॉयला आत सोण्यासाठी रितसर परवानगी मागितली गेली. मात्र त्यांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे डिलिव्हरी बॉयने महिलेला फोन केला. त्यानंतर त्या गेटवर आल्या आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मला कानशिलात लगावली.
अमित शर्मा पुढे म्हणाले, आम्हा सुरक्षा रक्षकांना त्यांनी गरीब म्हणून हिणवले आणि जातीवाचक टिप्पणी केली.
या प्रकरणी सोसायटीचे दुसरे सुरक्षा पर्यवेक्षक भानू प्रताप यांनी नऊ सुरक्षा रक्षकांच्या वतीने पोलिसांत तक्रार दिली. या महिलेवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
