आसामच्या गुवाहाटीमध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणे एक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतर पतीने क्रौर्याची सीमा गाठत पत्नीची निर्घृण हत्या केली. तो यावरच थांबला नाही, त्याने तिच्या मृतदेहाचे अवयव छाटले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला. २५ वर्षीय पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या ३० वर्षीय पतीला अटक केली असून त्याने गुन्हा मान्य केला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तिचे अवयव छाटून ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. रामानुज असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आज असं विधान केलं आहे की पत्नीची हत्या केल्याचा मला काहीही पश्चात्ताप नाही.
रामानुजने काय म्हटलं आहे?
मी माझ्या पत्नीला ठार केलं त्याचा मला मुळीच पश्चाताप नाही. मी कुणाचीही माफी या प्रकरणात मागणार नाही. मी माझ्या पत्नीला ठार केलं आहे. आता तिचा शुगर डॅडीही वाचणार नाही. मी तुरूंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर तिच्या शुगर डॅडीला ठार करेन असं रामानुजने म्हटलं आहे. माझी पत्नी म्हणाली होती की तिचा शुगर डॅडी आहे. त्यालाही मी ठार करेन असं रामानुजने म्हटलं आहे. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.
रामानुजला कोर्टात नेत असताना काय घडलं?
रामानुजला कोर्टात नेलं जात होतं. त्यावेळी रामानुजला विचारलं गेलं की शुगर डॅडी कोण आहे? त्यावेळी तो म्हणाला की पत्नीची हत्या केल्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. तसंच मी माफी मागणार नाही. पण तिच्या शुगर डॅडीलाही मी ठार करेन असं तो रागारागाने म्हटला आहे रामानुजला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.
हत्येचं हे प्रकरण काय आहे?
समोर आलेल्या बातमीनुसार, सदर दाम्पत्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. गुवाहाटीच्या हाटीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका रहिवाशी संकुलात सदर दाम्पत्य राहत होते. स्थानिकांनी दाम्पत्याचे घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार दिली होती. तसेच घरात दोन दिवसांपासून कुणीही नसल्याचे सांगितले होते. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर आतमधील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. तिथे शीर नसलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेची ओळख रिया तालुकदार असल्याचे सांगितले जाते. महिलेच्या हाताची बोटेही छाटल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाचे शीर शोधल्यानंतर ते घरातील फ्रिजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवल्याचे आढळून आले.
