आसाराम बापूचा जामीन अर्ज सहाव्यांदा फेटाळला

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याचा जामीन अर्ज लागोपाठ सहाव्यांदा न्यायालयाने फेटाळला आहे.

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याचा जामीन अर्ज लागोपाठ सहाव्यांदा न्यायालयाने फेटाळला आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आसाराम बापू तुरुंगात आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी आसारामचा जामीन अर्ज फेटाळताना सांगितले, की यातील गुन्हा जामीन मंजूर करण्यासारखा नाही.
भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी आसाराम बापूची बाजू मांडताना सांगितले, की हे सगळे प्रकरण कपोलकल्पित आहे व आसारामला जामीन मिळाला पाहिजे पण न्यायालयाने त्यावर आजपर्यंत निकाल राखून ठेवला होता. आसारामच्या जामीन अर्जाला विरोध करताना फिर्यादी पक्षाचे वकील पी.सी.सोळंकी यांनी सांगितले, की ज्या परिस्थितीत व ज्या वयाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे. त्याचा न्यायालयाने विचार करावा व मगच निर्णय घ्यावा. आसारामचे दोन जामीन अर्ज या आधी कनिष्ठ न्यायालयाने फेटाळले आहेत. त्याने दोनदा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला पण त्यात अपयश आले. सर्वोच्च न्यायालयानेही त्याला जामीन नाकारला आहे. आसारामला सप्टेंबर २०१३ मध्ये अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते. त्याने त्याच्या आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: No relief for asaram bapu court rejects bail plea again