नवी दिल्ली : करोना लशीच्या वर्धक मात्रेची आवश्यकता असल्याच्या समर्थनासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सोमवारी सांगितले.

भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (एनटीएजीआय) पुढील बैठकीत वर्धक मात्रेच्या मुद्दय़ावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

‘सर्व प्रौढ लोकसंख्येला करोना लशीची दुसरी मात्रा देणे आणि केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये लसीकरण केले जाईल याची खात्री करणे ही सरकारची सध्याची प्राथमिकता आहे’, असे भार्गव यांनी सांगितले.

देशात सध्या करोना प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि पात्र नागरिकांना दोन लसमात्रा देऊन लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार वर्धक मात्रेबाबत निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच करोना लशीची वर्धक मात्रा देण्याच्या संभाव्यतेबद्दल सांगितले होते.

‘सरकार या प्रकरणी थेट निर्णय घेऊ शकत नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि तज्ज्ञांचा गट जेव्हा वर्धक मात्रा द्या, असे सांगेल, तेव्हा आम्ही त्यावर विचार करू,’ असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच तज्ञांच्या मतावर अवलंबून असतात, मग ते लस संशोधन असो, निर्मिती किंवा मान्यता असो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

भारतातील पात्र लोकसंख्येपैकी सुमारे ८२ टक्के नागरिकांना पहिली मात्रा मिळाली आहे तर सुमारे ४३ टक्के नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. तर दोन मात्रांमधील विहित काळ पूर्ण केलेल्या १२ कोटींहून अधिक लाभार्थी दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत.

५३८ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या

नवी दिल्ली : देशात गेल्या ५३८ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या रविवारी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत ८,४८८ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४५ लाख १८ हजार ९०१ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधील १९६, तर महाराष्ट्रातील १७ जणांचा समावेश आहे. सलग ४५ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली, तर सलग १४८ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदली गेली आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांतही सातत्याने घट होत आहे. १ लाख १८ हजार ४४३ इतकी रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.३४ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे, तर करोनामुक्त होण्याची टक्केवारीदेखील ९८.३१ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. गेल्या २४ तासांत  सक्रिय रुग्णांमध्ये ४,२७१ने घट झाली आहे. 

देशात आतापर्यंत करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ६१ हजार ३८९ झाली आहे, तर मृत्युदर १.३५ टक्के  आहे. आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ३४ हजार ५४७ जण करोनामुक्त झाले आहेत.   दैनंदिन रुग्णवाढीचा दर १.०८ टक्के इतका नोंदला असून सलग ४९ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला.